चीनमधील आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी शिओमीच्या उपाध्यक्षपदी मनूकुमार जैन यांची निवड झाली आहे. मनू कुमार जैन हे सध्या शिओमीमध्येच भारतातील प्रमुख म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी कंपनीने मनू कुमार जैन यांना उपाध्यक्षपदी बढती दिली आहे.

शिओमी ही चीनमधील आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी असून या कंपनीचे उपाध्यक्ष ह्यूगो बारा यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिला होता. शुक्रवारी एमआय इंडियाने मनूकुमार जैन यांना उपाध्यक्षपदी बढती दिल्याचे जाहीर करण्यात आले. कंपनीतील उपाध्यक्ष पदासोबतच मनूकुमार जैन हे ‘शिओमी’चे भारतातील प्रमुख म्हणूनही कामकाज बघत आहेत. मनूकुमार जैन हे जून २०१४ मध्ये शिओमी कंपनीमध्ये रुजू झाले होते. यापूर्वी ते जबाँगमध्ये काम करत होते.

ह्यूगो बारा यांनी गेल्या महिन्यात शिओमीला सोडचिठ्ठी देत सिलिकॉन व्हॅलीमध्ये परतण्याचा निर्णय घेतला होता. ह्यूगो बारा हे सुमारे साडे तीन वर्ष शिओमीमध्ये कार्यरत होते. ह्यूगो बारा हे सध्या फेसबुकमध्ये दाखल झाले आहेत. शिओमीमध्ये दाखल होण्यापूर्वी ह्यूगो बारा हे गुगलमध्ये अँड्रोईडसाठी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट विभागात काम करत होते.

जैन हे शिओमीचे भारतातील प्रमुख असले तरी ह्यूगो बारा हे भारतासह जगभरातील सर्व कार्यक्रमांमध्ये आवर्जून उपस्थित असायचे. ह्यूगो बारा यांच्या सोडचिठ्ठीमुळे शिओमीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फटका बसेल अशी भीतीही व्यक्त होत आहे. जैन यांना बढती देऊन शिओमीने कंपनीसाठी भारतातील बाजारपेठ महत्त्वाची असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले असे जाणकारांनी सांगितले. शिओमीची चीनबाहेरील बाजारपेठ तब्बल १ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे.  मनूकुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने चांगली वाटचाल केली आहे. एका अहवालानुसार बाजारपेठेतील १० टक्के वाटा आणि एकूण विक्रीत १५ टक्क्यांनी वाढ दर्शवत शिओमी ही देशातील दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी झाली आहे. यामुळे कंपनीने त्यांना बढती दिल्याचे जाणकार सांगतात.