शाओमीने नुकताच चीनमध्ये Mi 6 फोन लॉन्च केला. मात्र Mi च्या भारतीय चाहत्यांना हा फोन वापरता येण्याची शक्यता कमीच आहे. शाओमीसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळेच बिजींगमध्ये आठवड्याभरापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या Mi 6 ची भारतातील अनेकांना प्रतीक्षा होती. मात्र सध्या तरी शाओमीकडून Mi 6 भारतात लॉन्च करण्याचा कोणताही विचार नाही. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

शाओमीला Mi 6 भारतात लॉन्च करायचा नसल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. Mi 6 ऐवजी शाओमी भारतीय बाजारात दुसरा स्मार्टफोन आणणार आहे. Mi 6 ऐवजी शाओमीकडून Mi Mix 2 किंवा Mi Note 2 भारतीय बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो. Mi 6 भारतात लॉन्च न करण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यातील एक मुख्य कारण Mi 6 ची किंमत असू शकते. कारण Mi 6 ची फोन भारतीय बाजारातील किंमत चीनमधील किमतीच्या तुलनेत जास्त होते. त्यामुळे हा फोन भारतीय बाजारपेठेत आल्यावर महाग होण्याची शक्यता आहे. Mi 6 भारतीय बाजारपेठेत आल्यास त्याची किंमत साधारणत: २३ ते २७ हजार इतकी असेल.

कमी किमतीत चांगले स्पेसिफिकेशन्स आणि उत्तम फिचर्स, ही भारतीय बाजारपेठेतील शाओमी फोन्सची ओळख आहे. Mi 6 चे स्पेसिफिकेशन्स उत्तम असले तरीही त्याची भारतीय बाजारात येताना कंपनीच्या इतर फोन्सच्या तुलनेत जास्त होईल. त्यामुळे Mi 6 ला तितकासा प्रतिसाद मिळणार नाही, असा कंपनीचा अंदाज आहे. याआधी Mi 3 आणि Mi 4 ला भारतीय बाजारपेठेत जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मात्र या फोन्सची किंमत १५ हजारांपेक्षा कमी होती.

मागील वर्षी शाओमीने Mi 5 भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला होता. मात्र या फोनला अपेक्षेइतका प्रतिसाद मिळाला नाही. Mi 5 चे हाय एंड वर्जन कंपनीने भारतीय बाजारपेठेत न आणल्यामुळे Mi 5 ला पुरेसे यश मिळाले नाही. शाओमीने Mi 5 चे हाय एंड वर्जन भारतात आणले असते, तर त्याची किंमत जास्त असू शकली असती. ‘Mi 5 चे हाय एंड वर्जन भारतात लॉन्च न करणे कंपनीची चूक होती,’ असे शाओमीचे माजी जागतिक उपाध्यक्ष ह्युगो बार यांनी म्हटले आहे.

काही वृत्तांनुसार, शाओमीकडून सध्या Mi Note 3 आणि Mi Mix 2 वर काम सुरु आहे. या दोन्ही फोन्सचे जुने वेरिएंट्स भारतात लॉन्च करण्यात आले नव्हते. यासोबतच शाओमीचे आणखीही काही फोन्स भारतात लॉन्च करण्यात आलेले नाहीत.