शिओमीचा रेडमी नोट ४ हा स्मार्टफोन भारतीय बाजारात आज लाँच झाला. फ्लिपकार्ट या इ-कॉमर्स वेबसाइटवर हा फोन २३ तारखेपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन ३ व्हॅरियंट्समध्ये उपलब्ध झाला आहे. २ जीबी, ३ जीबी आणि ४ जीबी या व्हॅरियंट्समध्ये हा फोन उपलब्ध आहे. २ जीबी रॅम (३२ जीबी इंटरनल मेमरी) ची किंमत ९,९९९ रुपये, ३ जीबी रॅम (३२ जीबी इंटरनल मेमरी)ची किंमत १०,९९९ रुपये आणि ४ जीबी रॅम (६४ जीबी इंटरनल मेमरी) ची किंमत १२,९९९ रुपये आहे. अनेक दिवसानंतर अत्यंत भरवशाचा आणि अद्ययावत फोन बाजारात आल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

रेडमी नोट हा शिओमीचा फ्लॅगशिप ब्रॅंड असून या फोनची आतुरतेने वाट पाहिली जात होती. भारतीय बाजारपेठेमध्ये शिओमीला जोरदार मागणी असून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण डिजाईन आणि अद्ययावत तंत्रज्ञानासाठी हा फोन ओळखला जातो. चीनमध्ये मागील वर्षी ऑगस्टमध्ये हा फोन लाँच झाल्यानंतर हा फोन भारतात कधी येतो याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली होती. सोनेरी, राखाडी आणि चंदेरी रंगांमध्ये हा फोन उपलब्ध होईल. या फोनला फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर, अॅंड्रॉइड ६.० मार्शमेलो ही ऑपरेटिंग सिस्टम आहे.

या फोनची स्र्कीन ५.५ इंच असेल, २.५ डी कर्व्हड ग्लास आणि ४०१ पिक्सेल डेन्सिटी ही या फोनची वैशिष्ट्ये आहेत. या फोनला १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा असेल. एलईडी फ्लॅश ऑटोफोकस असणार आहे. तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सल कॅमेरा आहे. या फोनची मेमरी १३२ जीबी एक्सपांडेबल एक्सटेंशनसह आहे. फिंगरप्रिंट स्कॅनरसह इंफ्रारेड सेन्सर देखील या फोनला आहेत. कनेक्टिविटीच्या बाबतीतही हा फोन अद्ययावत आहे. जीपीआरएस, एज, ३जी, ४जी, ब्लूटूथ, जीपीआरएस ही कनेक्टिविटीची साधने या फोनमध्ये उपलब्ध आहेत. या फोनची बॅटरी ४,१०० एमएमएच असेल.

सुरुवातीच्या काळात चीनमध्ये शिओमीला मोठी मागणी होती. शिओमी हा स्मार्टफोन विक्रीच्या बाबतीत अव्वल स्थानी होता परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये चीनमधील या फोनच्या विक्रीला उतरती कळा लागली. गेल्या काही दिवसांपासून चीनच्या स्मार्टफोन बाजारपेठेत मोठी उलथापालथ झाली आहे. अत्तापर्यंत सर्वात वरच्या स्थानावर असलेल्या शिओमीच्या विक्रीमध्ये ३८ टक्क्यांनी घट झाली असल्याचे ‘आयडीसी’ या प्रतिष्ठित संस्थेनी केलेल्या पाहाणीतून समोर आले.