झारखंड मुख्यमंत्रीपदासाठी यशवंत सिन्हा हे योग्य व्यक्ती आहेत असे सांगत ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. सिन्हा यांनी जामीन घेऊन झारखंडमधील जे विजेचे संकट आहे त्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करावे, असे आवाहन अडवाणींनी केले.
सिन्हा यांनी तुरुंगाबाहेर यावे अशी देशातील भाजप नेत्यांची भावना आहे असे अडवाणींनी सांगितले. त्यांनी कारागृहात सिन्हा यांची दोन तास भेट घेतली. सिन्हा यांनी छोटय़ा गावातून वीज संकटाच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली. गरीबांच्या भल्यासाठी हे आंदोलन असल्याने त्यांना व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे अडवाणी यांनी सांगितले. आतापर्यंत भाजपच्या इतर कोणत्याही नेत्यांनी इतके व्यापक आंदोलन केले नसल्याचे अडवाणी यांनी सांगितले. झारखंडचे नेतृत्व करण्याची क्षमता सिन्हा यांच्यात असल्याचे अडवाणी यांनी सांगितले. झारखंडमध्ये या वर्षी निवडणुका होणे अपेक्षित आहे. अडवाणी यांच्या समवेत माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र राय हे होते. दोन जून रोजी आंदोलना दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपावरून सिन्हा तुरुंगात आहेत.