येमेनमधील दुसरे मोठे शहर मानल्या जाणाऱ्या अ‍ॅडेन येथे लष्करी प्रशिक्षण छावणीत करण्यात आलेल्या कारबॉम्ब हल्ल्यात साठ जण ठार झाले आहेत, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोराने त्याचे वाहन नव्या छात्रांच्या गर्दीत घुसवले व स्फोट केला. उत्तर अ‍ॅडेनमध्ये ही घटना घडली आहे. या हल्ल्यात ६० ठार तर २९ जण जखमी झाले आहेत. जखमींना तीन रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी अगोदर हल्ल्यातील मृतांची संख्या ११ असल्याचे सांगितले होते.

अ‍ॅडेन हे बंदराचे शहर असून तेथे येमेनच्या सरकारचा तळ आहे. तेथे अनेकदा असे हल्ले झाले आहेत. त्यात नेहमीच अधिकारी व सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचा हेतू होता. अ‍ॅडेनमधील हल्ल्यांची जबाबदारी आतापर्यंत जिहादींनी घेतली आहे.

अल कायदा व आयसिस यांनी येमेनमधील अशांततेचा फायदा घेऊन दक्षिण व आग्नेय भागात हल्ले केले आहेत. येमेनी अधिकाऱ्यांनी अ‍ॅडेन येथे गेल्या दोन महिन्यांत अनेक सैनिकांना प्रशिक्षण दिले असून, दक्षिणकडचे काही प्रांत जिहादींकडून हिसकावले आहेत. येमेनी सरकारी दलांनी सौदी आघाडीच्या पाठिंब्याने अबयानची राजधानी झिंजीबार येथे प्रवेश केला आहे.

अबयानमधील शहरे ताब्यात घेताना अल काईदाचा बालेकिल्ला असलेल्या भागात कडवा संघर्ष झाला व त्यात अल माहफिद शहर ताब्यात घेण्यात आले. काही शहरे सरकारी दलांनी ताब्यात घेतली असली तरी आजूबाजूच्या भागात इराक समर्थित बंडखोरांचे अस्तित्व आहे. येमेनमधील यादवी युद्धात आतापर्यंत मार्च २०१५ पासून  ६६०० लोक मारले गेले असून, ८० टक्के लोकांनी जिवाच्या भीतीने पलायन केले आहे.