आपल्या वजनासाठी प्रसिध्द असलेल्या ‘नूरजहाँ’ प्रजातीच्या आंब्याचे उत्पादन यंदाच्या एप्रिल आणि मे महिन्यातील भीषण उष्णतेमुळे खूपच कमी प्रमाणात आले. त्यामुळे या आंब्याच्या अनेक चाहत्यांना त्याच्या खास स्वादापासून वंचित राहावे लागले. मूळचा अफगाणिस्तानातील असलेल्या या आंब्याची झाडे मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यामधील कठ्ठीवाडा प्रदेशात पाहायला मिळतात. एप्रिल आणि मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे ‘नूरजहाँ’च्या उत्पादनाला यावर्षी खूप मोठ्याप्रमाणावर नुकसान पोहोचल्याची माहिती इंदूरपासून २५० किमी अंतरावर कठ्ठीवाडा येथे राहाणारे या प्रजातीचे विशेषज्ञ इशाक मंसुरी यांनी दिली. दर वर्षी ‘नूरजहाँ’च्या एका झाडाला साधारणपणे ४०० आंबे लागतात. परंतु, यावेळी एका झाडाला केवळ ७५ च्या आसपास आंबे लागल्याचे त्यांनी सांगितले. एप्रिल आणि मे महिन्यातील भीषण उष्णतेमुळे भूगर्भातील जलस्तरामध्ये घट झाल्याने ‘नूरजहाँ’ झाडाच्या हिरव्या फांद्या पार सुकल्या, तसेच मोहराचे प्रमाणदेखील खूप कमी होते. साधारणपणे ३.५ ते ३.७५ किलोच्या दरम्यान वजन असणाऱ्या ‘नूरजहाँ’चे यावेळचे वजन दोन किलोच्या आसपास राहिले. कठ्ठीवाडा प्रदेशात नूरजहाँची केवळ तीन झाडे राहिली असून ती अतिशय जुनी असल्याची माहिती मंसुरींनी दिली.
पर्यावरणातील परिवर्तानाने तापमानात आलेल्या असामान्य वाढीमुळे, तसेच योग्य देखभालीच्या अभावामुळे नूरजहाँच्या उत्पादनात सतत घट होत असल्याचे त्यांनी सांगितले. कठ्ठीवाडा व्यतिरिक्त इतर ठिकाणीदेखील नूरजहाँच्या लागवडीचे अनेक प्रयोग करण्यात आले. परंतु त्यात अद्याप यश आलेले नाही. ‘नूरजहाँ’च्या झाडाची उंची केवळ सात ते आठ फूट इतकी असते, जी आंब्याच्या इतर प्रजातीच्या झाडांच्या उंचीच्या मानाने फारच कमी असल्याचे मंसुरींनी सांगितले. जेव्हा ‘नूरजहाँ’च्या झाडाला आंबे येण्यास सुरुवात होते तेव्हा आंब्याच्या वजनाने झाड वाकायला लागते. शेवटीशेवटी तर परिस्थिती अशी होते की झाडाला कापडाच्या पिशव्या बांधून आंब्यांना आधार द्यावा लागतो, जेणेकरून ते वेळेच्या आधीच झाडावरून खाली पडणार नाहीत. ‘नूरजहाँ’च्या कमी उत्पादनामुळे झाडाला आंबे लागलेले असतानाचा ‘नूजरहाँ’चे चाहते आंब्याची नोंदणी करण्यास सुरूवात करतात. बाजारात मागणी वाढल्यास ‘नूरजहाँ’च्या एका आंब्याची किंमत ५०० रुपयांपर्यंत पोहोचते. ‘नूरजहाँ’च्या झाडांना जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मोहोर धरण्यास सुरुवात होते आणि मे-जूनपर्यंत तयार आंबे मिळतात.