योगसाधनेचा हिंदू धर्माशी संबंध जोडला जात असता तरी ती धार्मिक कृती नाही. लोकांनी त्यांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी योगासनांचा मार्ग अवलंबला पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिटी ब्युटिफूल असलेल्या चंडीगड येथे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंगळवारी व्यक्त केले. अनेक उत्साही साधकांनी त्यांच्यासमवेत सेल्फी काढण्याची संधी सोडली नाही. ते म्हणाले, की योग ही धार्मिक कृती नाही. लोकांना योग म्हणजे काय ते पूर्ण माहीत नाही. तुम्हाला योगातून काय मिळते यापेक्षा तुम्ही योगाला काय देता हे महत्त्वाचे आहे. योगासनांच्या माध्यमातून व्याधिमुक्त झाले पाहिजे. आस्तिक व नास्तिक दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी योग आहे, त्यामुळे योगासने हिंदू धर्माशी संबंधित आहेत असा वाद निर्माण करण्याची गरज नाही. आरोग्याच्या समस्यांतून योगामुळे मुक्ती मिळते. कार्यक्रमात पावसाची चिन्हे होती, पण तसे काही न होता तासभर व्यवस्थित कार्यक्रम झाला. कार्यक्रमानंतर मात्र पाऊस सुरू झाला. मोदी यांनी योगसाधकांच्या मधून फेरी मारून पाहणीही केली व त्यांच्यासमवेत योगासने केली. योग हे विज्ञान आहे व त्यातून आपण बरेच काही मिळवू शकतो, योगासने तुमच्या जीवनाचा भाग बनवा. मोबाइल फोन खिशात ठेवता तसे रोज योगासनेही नेमाने करीत जा. त्यामुळे मन नियंत्रित होते. शरीराचे आरोग्य टिकते, जीवनाला शिस्त लागते. योग आयुष्यात सुख-समाधान प्राप्त करून देतो. मन व शरीराचा तोल सांभाळतो, कुठेही तुम्ही योगासने करू शकता. रोजच्या जीवनात व्यस्त असल्याने आपणच आपल्यापासून तुटत आहोत. तुम्हाला तुमच्याशी जोडण्याचे काम योग करील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत किमान ३० हजार लोकांनी चंडीगड येथील मुख्य कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योगासने केली. पुढील एक वर्षांत योगसाधक व शिक्षक यांनी मधुमेह दूर करण्यासाठी योगसाधनेचा वापर करावा, असे मोदी यांनी या वेळी सांगितले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर योगाचा प्रसार करण्यासाठी दोन पारितोषिके पुढील वर्षीपासून दिली जातील असे त्यांनी जाहीर केले.

मोदी यांनी पांढरा शर्ट व पँट परिधान केली होती व स्कार्फही घातला होता. तीस हजार लोक या योगदिन कार्यक्रमास उपस्थित होते. त्यात संरक्षण दलाचे जवान, शाळकरी मुले यांचा समावेश होता. कॅपिटॉल कॉम्प्लेक्स येथे कडक सुरक्षेत हा कार्यक्रम झाला. पंतप्रधान मोदी काल रात्रीच चंडीगडला आले होते. संयुक्त योग कार्यक्रमात त्यांनी लोकांसमवेत योगासने केली. चंडीगड, पंजाब व हरयाणाचे प्रत्येकी दहा हजार लोक यात सहभागी झाले. या वेळी गुलाबी व निळय़ा चटया वापरण्यात आल्या. इतर १० हजार लोकांनी चंडीगडलाच इतर ठिकाणी योगाचे कार्यक्रम केले.  भोपाळमध्ये स्मृती इराणींचे मार्गदर्शन

भोपाळ येथे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या नेतृत्वाखाली योगदिनाचा कार्यक्रम झाला. प्राचीन भारत व आधुनिक युग यांच्यात पूल बांधण्याचे काम आंतरराष्ट्रीय योगदिनाने केले आहे असे त्यांनी लाल परेड ग्राऊंड येथे

झालेल्या कार्यक्रमात सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगदिनासाठी जे प्रयत्न केले त्याची प्रशंसा करतानाच त्यांनी मध्य प्रदेश सरकारला कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल धन्यवाद दिले.

राज्याचे गृहमंत्री बाबुलाल गौर हे पाय फ्रॅक्चर असतानाही योगासने करण्यास आले होते. त्यांनी सांगितले, की योग व भगवद्गीता ही माझ्या जीवनाची अविभाज्य अंगे आहेत. अल्पसंख्याकांचा ओंकारास विरोध आहे, त्यावर विचारले असता बाबुलाल गौर यांनी सांगितले, की बाबा रामदेव यांच्या मताप्रमाणे त्यांना जर ॐ मान्य नसेल तर त्यांनी योगासने करताना ‘आमीन’ म्हणावे त्याचाही फायदा होईल.

दिल्लीत उत्साह

दिल्लीकरांनी योगदिनाला उत्साहात प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी योगाचे कार्यक्रम आयोजित केले होते. कॅनॉट प्लेस येथे १०००० जणांनी सहभाग नोंदवला. पहाटे साडेपाचपासून लोक येण्यास सुरुवात झाली. त्याशिवाय आयुष मंत्रालयाने लोधी गार्डन, नेहरू पार्क, तालकटोरा गार्डन, स्वर्णजयंती पार्क, यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, द्वारका येथे योगासन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दिल्लीतील कार्यक्रमात वेंकय्या नायडू, नायब राज्यपाल नजीब जंग व भाजप खासदार मीनाक्षी लेखी आदी उपस्थित होते. सीआयएसएफच्या २५० जवानांनी शानदार योग प्रात्यक्षिके सादर केली.

रामदेव बाबांचा विक्रम 

योगगुरू रामदेव बाबा यांनी हरयाणातील फरिदाबाद येथे योगासनांचा कार्यक्रम घेतला. त्यात एक लाखाहून अधिक लोक सहभागी झाले होते, त्यामुळे तो जागतिक विक्रम असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

योगाद्वारे मधुमेहावर नियंत्रण मिळवा- पंतप्रधान

मधुमेहाच्या उपचारासाठी योगासनांचा वापर केला पाहिजे असे सांगून ते म्हणाले, की प्रशिक्षकांनी पुढील वर्षी लोकांच्या मधुमेहावर लक्ष केंद्रित करावे. पुढील वर्षभरासाठी मधुमेह व योग हा विषय त्यांना मी देत आहे. साधक व प्रशिक्षकांनी त्यांच्या ज्ञानानुसार मधुमेहाविरोधात प्रयत्न करावेत. मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत, त्यांचा हा रोग नियंत्रणात राहिला पाहिजे. हा रोग पूर्ण घालवता येईल की नाही हे ठामपणे सांगता येत नाही, पण योगासनांच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण मिळवता येईल. सामान्य लोकांना होणाऱ्या मधुमेहावर योगासनांचा वापर झाला पाहिजे. मधुमेहावर उपाय होऊ  शकला तर पुढील वर्षी इतर रोगांकडे बघता येईल. दरवर्षी एक रोग घेऊन आपण त्याच्याशी लढले पाहिजे. त्यासाठी योगासनांचा उपाय आहे. योग हा रोगनिवारणाचाच मार्ग नव्हे तर जीवन जगण्यात समाधान निर्माण करणारा एक मार्ग आहे. व्यक्तीच्या सर्वागीण विकासासाठी योगाला पर्याय नाही.