सार्वजनिक ठिकाणांवर महिलांची छेड काढणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या अँटी रोमियो पथकाचे नामांतर करण्यात आले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेले पथक आता नारी सुरक्षा दल म्हणून ओळखले जाणार आहे. आधी एँटी रोमियो नावाने ओळखले जाणार पथक आता नव्या ‘अवतारात’ दिसेल, अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारमधील एका मंत्र्याने दिली आहे.

‘माता भगिनींचा सन्मान भाजपची प्राथमिकता आहे,’ अशी माहिती लखनऊमधील भाजपचे नेते राजेंद्र प्रताप मोती यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलताना दिली. एँटी रोमियो पथकाचे नाव बदलून ते नारी सुरक्षा दल करण्यात आले आहे. अँटी रोमिया पथकाच्या नावातील बदलामागील कारण मात्र राजेंद्र प्रताप यांनी सांगितलेले नाही. ‘अँटी रोमिया नावामुळे पथकाबद्दल लोकांच्या मनात नकारात्मक भावना होती,’ अशी माहिती पोलीस दलातील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महिला सुरक्षा दलाच्या सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान पथकाचे नाव बदलण्याबद्दल चर्चा झाली होती. अँटी रोमिया पथकाच्या कारवायांची फक्त उत्तर प्रदेशातच नव्हे, तर देशभरात चर्चा होती. अनेकदा या पथकाच्या कारवाया वादग्रस्त ठरल्या आहेत. उत्तर प्रदेशचे डीजीपी सुलखान सिंह यांनी अँटी रोमियो पथकातील अधिकाऱ्यांसाठी एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेत बोलताना अनेक अधिकाऱ्यांनी त्यांना प्रेमी युगुलांना त्रास देण्यात आणि मॉरल पोलिसिंग करण्यात रस नसल्याचे म्हटले. शाळा, महाविद्यालय, बाजारपेठांसह सार्वजनिक ठिकाणी महिलांना सुरक्षित राहता यावे हेच अँटी रोमियो पथकाचे उद्दिष्ट असावे, यावर कार्यशाळेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांचे एकमत झाले.