उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नमाज पठण आणि सूर्य नमस्काराची पद्धत एकसमान असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पडली असून आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा मौलवींनी निषेध केला आहे. उत्तर प्रदेशात आयोजित योग संमेलनात ते बोलत होते. ज्या प्रमाणे सूर्यनमस्कारात आसन असतात. त्याचप्रमाणे आसन हे नमाजमध्ये असतात तर सूर्यनमस्कारात जसे प्राणायाम असतात तसेच श्वसनाचे प्रकारही नमाजमध्ये असतात. दोन्ही प्रक्रिया समानच आहेत परंतु हिंदू-मुस्लिमांनी त्यामध्ये साधर्म्य शोधण्याचा प्रयत्न केला गेला नसल्याचे ते म्हणाले. २०१४ च्या पूर्वी योगाबदद्ल फारसे बोलले जात नसे पंरतु नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यापासून योगाचा जगभर प्रसार झाला आहे. त्यांनी योगाला जगभर मान्यता मिळवून दिली असल्याचे ते म्हणाले. योगाचे सामर्थ्य तुमच्या लक्षात आलेच असेल असे देखील ते म्हणाले. लोक योग्याला भीक सुद्धा घालत नाही परंतु नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशातील जनतेने तर माझ्या हाती राज्यच दिल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला योगगुरू रामदेव बाबा हे देखील हजर होते.