राहुल गांधी यांच्या गोरखपूर दौऱ्याच्या काही वेळापूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गोरखपूर मध्ये ‘स्वच्छ यूपी, स्वस्थ यूपी’ अभियानाच्या उद्घाटनावेळी आलेल्या आदित्यनाथांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावरही निशाणा साधला. आदित्यनाथ यांनी गोरखपूर दुर्घटनेत मृत पावलेल्या बालकांचा उल्लेख केला नाही. पण दिल्लीत बसलेल्या युवराजला आणि लखनऊत बसलेल्या पुत्राला पूर्व उत्तर प्रदेशमधील वेदना समजणार नाहीत, असा टोला लगावला. अप्रत्यक्षरित्या ते गोरखपूर येथील बीआरडी रूग्णालयात घडलेल्या घटनेनंतर येथे भेट देणाऱ्या नेत्यांवर टीका करताना दिसले. मी गोरखपूरला ‘पिकनिक स्पॉट’ बनू देणार नाही, अशा शब्दांतही त्यांनी ठणकावले.

या वेळी त्यांनी मागील सरकारच्या कारभाराचाही समाचार घेतला. गत १२-१५ वर्षांत मागील सरकारने आपल्या स्वार्थासाठी भ्रष्टाचार करून उत्तर प्रदेशला उद्ध्वस्त करून टाकले आहे.

राज्याला स्वच्छ आणि स्वस्थ बनवण्यासाठी सामान्य नागरिकांच्या सहभागची गरज आहे. ज्या दिवशी राज्यातील प्रत्येक नागरिक स्वच्छता अभियानात सहभागी होईल त्या दिवशी राज्यातून चिकनगुनिया व इतर आजार संपुष्टात होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.