भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कंत्राटाची कामे घेऊ नये असे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. त्यांच्या या आदेशामुळे पक्षात केवळ कंत्राटे आणि इतर कामांसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटीची कामे न घेता त्या कामांवर लक्ष ठेवावे आणि त्यात जर काही भ्रष्टाचार झाला तर मला त्याबाबत सांगावे असे आदित्यनाथांनी सांगितले. त्यांच्या या आदेशामुळे उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाला जनतेनी बहुमताने निवडून दिले आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाईल असे काम करू नका असे त्यांनी म्हटले. कुठल्याही लोकप्रतिनिधीने अथवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने कंत्राटाची कामे घेऊ नये असे ते म्हणाले. विजयानंतर आपल्याला बरीच कामे पूर्ण करायची आहेत. त्यामुळे भरपूर कामे निघणार आहेत तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कटाक्षाने या कामांपासून दूर राहावे अशी सक्त ताकीद त्यांनी दिली.

१८ ते २० तास काम करा

ज्यांना जनतेचे काम करायचे आहे, ज्यांची रोजचे १८ ते २० तास काम करायची तयारी आहे त्यांचे स्वागत आहे असे ते म्हणाले. ज्या लोकांची इतके काम करण्याची तयारी नाही त्यांनी चालते व्हावे असे ते म्हणाले. २०१९ ला लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकांना सामोरे जाताना आपण केवळ काम आणि योजनांच्या स्वरुपातच  लोकांशी नाते जोडावे असे ते म्हणाले.

मौजमजेचे दिवस नाहीत, काम करायचे दिवस आहेत

जनतेने विश्वासाने आपल्याला निवडून दिले आहे. तुम्हाला मिळालेली पदे ही काही मिरवण्यासाठी नाही असे ते म्हणाले. तेव्हा या पदांचा उपयोग जनतेच्या कामासाठीच होईल याची काळजी घ्यावी असे ते म्हणाले. मौजमजेचे दिवस संपले आहेत, आता केवळ कामाचे दिवस आहेत हे लक्षात ठेवा असे ते म्हणाले.

आमदार आणि मंत्र्यांची दारे जनतेसाठी सतत उघडी पाहिजे

आमदार आणि खासदारांनी केवळ मोठ्या कारमधून फिरणे किंवा मोठ्या घरात राहणे अपेक्षित नाही. जनतेशी संपर्क तुटता कामा नये असे त्यांनी सांगितले. जनतेचे कुठलेही काम असो तुम्ही ते नेहमी केले पाहिजे. जनतेसाठी तुमची दारे नेहमी उघडी हवी अशी सूचना आदित्यनाथांनी दिली.