लवकरच आधार कार्डधारक त्यांच्याकडे असणाऱ्या आधार कार्डचा वापर डेबिट आणि क्रेडिट कार्डसारखा करु शकणार आहेत. आधार कार्डच्या माध्यमातून बँक खात्यातील पैसे काढण्याची सुविधा सरकारकडून उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यामुळे आता आधार कार्डच्या सहाय्याने कॅशलेस व्यवहार करता येणे शक्य होणार आहे. अर्थव्यवस्था कॅशलेस करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल टाकण्यात आले आहे.

आधार कार्डच्या माध्यमातून मिळणारी सेवा सुरु करण्यासाठी लोकांना आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर फिंगरप्रिंट स्कॅनरच्या माध्यमातून व्यक्तीची पडताळणी केली जाईल. यासाठी आधार कार्डची बायोमेट्रिक पडताळणी क्षमता दरदिवशी वाढवली जाईल, अशी माहिती युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण पांडे यांनी  दिली आहे.

‘आम्ही लवकरच आधार कार्ड्सची पडताळणी क्षमता ४० कोटींवर पोहोचवणार आहोत. कालच आम्ही १ कोटी ३१ लाख आधार कार्ड्सची बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण केली,’ अशी माहिती पांडे यांनी दिली. या सेवेबद्दल जागरुकता वाढवण्यात येईल, असेही पांडे यांनी सांगितले.
‘आधार कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांबद्दल गोपनीयता बाळगली जाईल. आधार कार्ड आणि बँक खाते संलग्न केली जाणार आहेत. त्यामुळे आधारच्या माध्यमातून अनेक व्यवहार करणे शक्य होईल. यामध्ये पैसे पाठवणे, शिल्लक रकमेची चौकशी, पैसे काढणे, पैसे भरणे, असे दैनंदिन व्यवहार करणे शक्य होईल,’ अशी माहिती भूषण पांडे यांनी दिली.

आधार कार्डच्या माध्यमातून विविध व्यवहार करता येणे सुलभ व्हावे, यासाठी लवकरच एँड्रॉईड मोबाईलवर ऍप आणण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी दिली आहे. ‘येत्या १५ दिवसांमध्ये हे ऍप उपलब्ध करुन देण्यात येईल. फिंगरप्रिंट स्कॅनरच्या माध्यमातून या ऍपमधून व्यवहार करणे शक्य होईल. फिंगरप्रिंट स्कॅनिंगसाठी ऍपमध्येच स्कॅनर देण्यात येईल. याशिवाय फोनमधील किंवा फोनबाहेरील यंत्रणेचा वापर करुनही फिंगरप्रिंट स्कॅनिंग करता येईल. यासाठी मोबाईलची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत बातचीत केली जाणार आहे,’ असेही अमिताभ कांत यांनी म्हटले आहे.

अधिकाधिक व्यवहार कॅशलेस व्हावेत, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अनेक पर्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी जीएसएम मोबाईलवर यूएसएसडीची सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. याशिवाय स्मार्टफोन्ससाठी ई-वॉलेटची सुविधादेखील पुरवली जाणार आहे.