धर्मनिरपेक्षता मला शिकवू नका, काही जण धर्मनिरपेक्षतेचा वापर भ्रष्टाचारावर पडदा टाकण्यासाठी आणि स्वतःचे पाप लपवण्यासाठी करतात, पण आम्ही विचाराने धर्मनिरपेक्षतेचे समर्थक आहोत अशा शब्दात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधकांना सुनावले आहे. सत्ता ही कुटुंबाची नव्हे तर राज्याची सेवा करण्यासाठी असते असा टोलाही त्यांनी लालूप्रसाद यादवांना लगावला.

बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विधानसभेत भूमिका मांडली. आम्ही विचाराने धर्मनिरपक्षतेचे समर्थक असून पारदर्शक कारभाराला आम्ही प्राधान्य देतो. आम्हाला कोणीही धर्मनिरपेक्षता शिकवायची गरज नाही असे त्यांनी सुनावले. संयुक्त जनता दलाचा एक मार्ग असून आम्ही त्या मार्गावर भरकटू शकत नाही हे माझ्या लक्षाते आले आणि म्हणूनच मी महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले. विधानसभेच्या मर्यादांचे उल्लंघन होऊ नये असे मला वाटते. मी प्रत्येक आरोपावर प्रत्युत्तर देणार. महाआघाडीत एका पक्षाकडून माझ्याविरोधात अनेक विधाने केली जात होती. मी हे सगळं सहन केलं असे त्यांनी नमूद केले.

महाआघाडीत काँग्रेसचा समावेश आहे. या पक्षाला बिहारमध्ये १५ ते २० जागाच मिळाल्या असत्या. पण आम्ही त्यांना ४० चा आकडा गाठून दिला असे त्यांनी काँग्रेस आमदारांना सुनावले. जनता हे सर्वात मोठे न्यायालय असून जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सत्ता ही राजभोगासाठी किंवा मेव्यासाठी नसते असा चिमटा त्यांनी राजद आणि काँग्रेसला काढला. आम्ही बिहारमधील जनतेच्या हितासाठीच महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असा पुनरुच्चार त्यांनी केला.  एनडीएत असताना भागलपूरमध्ये दंगल झालेली. राज्यात आमची सत्ता येताच आम्ही नव्याने तपास करुन पीडितांना न्याय मिळवून दिला असा दावा त्यांनी केला. धनसंपत्तीसाठी राजकारण करणाऱ्यांचे आम्ही समर्थन करु शकत नाही. आमच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांचे मी आभार मानतो. आता केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्याने बिहार विकासाचे शिखर गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही आणि राज्यात सुशासन असेल अशी ग्वाही त्यांनी विधानसभेत दिली.