राजधानी एक्स्प्रेसमधील एसी-१ आणि एसी-२ क्लासचे तिकीट कन्फर्म न झाल्यास आता रेल्वेकडून विमान तिकीट दिले जाऊ शकते. मात्र यासाठी ट्रेन आणि विमान तिकीटातील दरांमध्ये असणारी तफावतीची रक्कम प्रवाशांना द्यावी लागणार आहे. अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक असताना याबद्दलचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवला होता. मात्र गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात पाठवण्यात आलेल्या या प्रस्तावाला रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता. मात्र आता लोहानी स्वत: रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी आहेत. त्यामुळे आता एअर इंडियाकडून याबद्दलचा प्रस्ताव आल्यास, त्याला मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

देशभरात रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना तिकीट मिळत नाही. राजधानी एक्स्प्रेसदेखील याला अपवाद नाही. त्यामुळेच एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक असताना अश्वनी लोहानी यांनी एक प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला दिला होता. ‘राजधानी एक्स्प्रेसचे कन्फर्म तिकीट न मिळू शकणाऱ्या प्रवाशांची माहिती आणि संपर्क क्रमांक रेल्वेने दिल्यास, या प्रवाशांना विमानामध्ये तिकीट दिले जाऊ शकते. यासाठी जास्त पैसेदेखील मोजावे लागणार नाहीत. कारण राजधानी एसी-२ क्लास आणि विमान तिकीट यांच्यातील तिकीट दरांमध्ये फारसा फरक नाही,’ असे लोहानी यांनी त्यांच्या प्रस्तावात म्हटले होते. मात्र या प्रस्तावाला त्यावेळी रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता.

रेल्वे आणि एअर इंडिया सरकारच्या ताब्यात असल्याने लोहानी यांचा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरु शकला असता. मात्र आता सरकारकडून एअर इंडियाच्या खासगीकरणाचे प्रयत्न सुरु आहेत. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे एअर इंडियाकडून असा प्रस्ताव दिला जाणार का, हे पाहणे महत्त्वपूर्ण असेल. ‘तिकीट कन्फर्म न झालेल्या प्रवाशांना रेल्वे एअर इंडियाकडे पाठवू शकते. सरकारी विमान वाहतूक कंपनी असल्याचा हा फायदा आहे. लोहानी यांची संकल्पना अत्यंत चांगली आहे. मात्र रेल्वे एखाद्या खासगी हवाई वाहतूक कंपनीसोबत अशाप्रकारे सहकार्याचा विचार करु शकते का? तसे झाल्यास खासगी कंपनीच्या फायद्यासाठी अशा प्रकारचे सहकार्य केल्याचा आरोप होईल,’ असे एअर इंडियामधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.