गोव्यातील नाईटक्लबमध्ये जाणाऱ्या तरूणी तोकडे कपडे घालत असल्याने राज्याच्या संस्कृतीला धोका निर्माण झाल्याचे वक्तव्य, गोव्यातील सार्वजनिक विभागाचे मंत्री सुदीन धनवलीकर यांनी केले. सुदीन धनवलीकर पणजी येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी गोव्यातील तरूण मुलींनी प्रत्येक ठिकाणी तोकड्या कपड्यांमध्ये वावरणे हे गोव्याच्या संस्कृतीचा भाग नसल्याचे त्यांनी सांगितले. हे जर असेच सुरू राहिले तर पुढे काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तरूण मुलींना तोकड्या कपडे घालण्यास बंदी केली पाहिजे, अशी मागणी सुदीन धनवलीकर यांनी केली. या वक्तव्यामुळे आता धनवलीकर यांची तुलना श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिक यांच्याशी करण्यात येत आहे. गोव्यातील तरूण मुलींना तोकडे कपडे घालण्यापासून रोखण्याच्या उद्देशाने प्रमोद मुतालिक यांनी गोव्यामध्ये श्रीराम सेनेची शाखा स्थापन करण्यासाठी परवानगी मागितली होती. सुदीन धनवलीकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना प्रमोद मुतालिक यांच्या वक्तव्याशी आपण काही प्रमाणात सहमत असल्याचेसुद्धा सांगितले.