ऐतिहासिक वारसा असलेला काँग्रेस पक्ष; तसेच देशाची जनता हेच आपले जीवन आहे, असे नमूद करतानाच, त्यांच्यासाठी सत्तेचे ‘हलाहल’ पचविण्याचा निर्धार काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला अन् त्यांच्या अखंड खळाळत्या भाषणाने समोर उपस्थित असलेले तमाम काँग्रेसजन अक्षरश थरारून गेले. अखिल भारतीय काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्षातील तमाम दिग्गज नेत्यांना प्रथमच संबोधित करताना राहुल गांधी कमालीचे भावूक झाले होते. इंग्रजी, हिंदू आणि पुन्हा इंग्रजीत अत्यंत प्रभावीपणे केलेल्या त्यांच्या या भाषणाने येथील बिर्ला सभागृहात उपस्थित काँग्रेसचे तमाम ज्येष्ठ नेते आणि देशभरातील प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसह सुमारे दीड हजाराहून अधिक उपस्थित भारावून गेले. अत्यंत संयत आणि प्रभावी शैलीत केलेल्या राहुल यांच्या भाषणाला पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह सभागृहातील काँँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी दोन मिनिटे उभे राहून भावपूर्ण दाद दिली. सोनिया गांधी यांनी तर व्यासपीठावरच आपल्या पुत्रास प्रेमातिशयाने कवटाळून भावनांना वाट करून दिली.
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर घडलेल्या घटनांचे हृदयस्पर्शी वर्णन राहुल गांधींनी केले, तेव्हा संपूर्ण सभागृह हेलावून गेले. ‘‘इंदिरा गांधींची हत्या करणारे सुरक्षारक्षक माझे सर्वात जवळचे मित्र होते. त्यांच्याकडून मी बॅडमिंटन शिकलो. त्यांनी माझ्या आजीची हत्या केली तेव्हा माझे वडील कोलमडून गेले होते. आयुष्यात प्रथमच मी त्यांना ढसाढसा रडताना पाहिले,’’ अशी आठवणी त्यांनी सांगितली तेव्हा सभागृह निस्तब्ध झाले होते.
शनिवारी जेव्हा उपाध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली, तेव्हा अनेकांनी माझे अभिनंदन केले. त्यात माझी आईही होती. नंतर माझ्या खोलीत बसून ती रडली. कारण सर्वांना जी सत्ता वाटते ते विष आहे, याची तिला जाणीव आहे. सत्तेत नसल्यामुळे तिला हे ठाऊक आहे. सर्वाना हवीहवीशी वाटणारी सत्ता खरे तर विष आहे. सत्ता गाजविण्यासाठी सत्ता मिळवायची नसून तिचा वापर कमकुवत आवाजाला सशक्त करण्यासाठी झाला पाहिजे.
काँग्रेस ही जगातील एक सर्वात मोठी संघटना आहे. पण ती नियमाने चालत नाही. येथे नियम आहेत, पण ते सगळे दुर्लक्षिले जातात. मोठी गमतीशीर संघटना आहे ही. ती कशी चालते याचेच मला आश्चर्य वाटते. येथे नियम आणि र्निबधांची आवश्यकता आहे. राहुल गांधी