पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ अभियानाच्या यशस्वीतेबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शंका व्यक्त करत सरकारबद्दल युवकांचा भ्रमनिरास होत असल्याचे स्पष्ट केले. बिहार सरकारने येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केजरीवाल यांनी दिल्लीत वीज आणखी स्वस्त करण्याचे संकेत दिले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी काळा पैसा देशात आणण्याचे जे आश्वासन मोदींनी दिले होते, मात्र आता ते जनतेला योगासने करण्याचा सल्ला देत आहेत अशा शब्दांत केजरीवाल यांनी मोदींवर तोफ डागली.
स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिरातींवर कोटय़वधींची उधळपट्टी करण्यात आली. मात्र एक मार्गही स्वच्छ झाला नाही अशी खिल्ली त्यांनी उडवली. बिहारमधील आगामी निवडणुकांचा संदर्भ देत येथील जनतेला केंद्राचे की दिल्लीचे प्रारूप यातून निर्णय घ्यायचा आहे असे सांगत नितीशकुमारांच्या प्रचाराचा नारळच फोडला.
दिल्लीतील प्रचारात स्वस्त विजेबद्दल आम्ही जेव्हा घोषणा करत होतो, त्यावेळी आमची खिल्ली उडवण्यात आली. मात्र आता दिल्लीतील जनता समाधानी असून, आता जर दिल्लीत निवडणूक झाली तर आम्ही सर्व ७० जागा जिंकू असा दावा केजरीवाल यांनी केला. नकारात्मक व आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला जनता थारा देणार नाही असे त्यांनी सांगितले.

भाजपचे प्रत्युत्तर
नितीशकुमार हे सत्तेसाठी केजरीवाल यांना बरोबर घेत असल्याची टीका भाजपने केली आहे. लालूप्रसाद यादव यांच्यासमवेत नितीशकुमार यांच्या आघाडीचा दाखला भाजपने देत विकासाची चक्रे उलटी फिरवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पत्रा यांनी केला आहे.