‘पर्ल्स’ ग्रुपच्या तब्बल ४५ हजार कोटींच्या घोटाळाप्रकरणी क्रिकेटपटू हरभजन आणि युवराज सिंग गोत्यात येण्याची शक्यता आहे. ‘पर्ल्स’ ग्रुपच्या लाभार्थींची यादी अंमलबजावणी संचलनालय(ईडी) आणि सीबीआयने तयार केली असून, यादीत हरभजन, युवराजसह ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट ली याचाही समावेश आहे.

पर्ल्सच्या मालमत्तांवर छापे

पर्ल्स घोटाळ्याची व्याप्ती भरपूर मोठी असून, या ग्रुपचा चेअरमन निर्मल सिंह भंगू आणि त्याचे चार सहकारी सध्या अटकेत आहेत. त्यांच्या चौकशीत या घोटाळ्यातील रक्कम मोठ्या प्रमाणात क्रिकेटपटू आणि चित्रपटकलाकारांवर खर्च करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पर्ल्स ग्रुपने हरभजन आणि युवराजला मोहालीत प्लॉट बक्षिस म्हणून दिले होते, तर ऑस्ट्रेलियात आपल्या कंपनीचा विस्तार होण्यासाठी पर्ल ग्रुपने ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट ली याला ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते. त्यामुळे हे तिघेही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

सेबीच्या ‘दंडुक्या’नंतरही देशभरात ९९५ ‘पोन्झी’ योजनांचे फसवे जाळे कार्यरत

दरम्यान, युवराजची आई शबमन यांनी युवराज किंवा त्यांच्या कुटुंबितील कोणत्याही सदस्याचा पर्ल ग्रुपशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. २०११ सालच्या विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू म्हणून पर्ल्स ग्रुपकडून युवराजला मोहालीतील एक प्लॉट बक्षिस म्हणून देणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते. पण तो युवराजला मिळालेला नाही. याशिवाय आमचा पर्ल्स कंपनीशी कोणताही संबंध नाही, असे शबनम यांनी सांगितले.