वादग्रस्त इस्लामी धर्मप्रसारक झाकीर नाईक याच्यावर राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयए या आठवडय़ात आरोपपत्र दाखल करणार असून त्याच्यावर दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा व काळा पैसा जमवल्याचे आरोप आहेत. गेल्या जुलैत  नाईक हा देश सोडून गेला होता. त्याच्यावर या आठवडय़ात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

नाईक सध्या परदेशात असून एनआयएने त्याच्यावर काळा पैसा जमवणे व दहशतवादी कारवायांना पैसा पुरवणे असे आरोप केले आहेत. बांगलादेशातील काही दहशतवाद्यांनी त्याच्या भाषणांमुळे दहशतवादासाठी फूस मिळाल्याचे म्हटले होते. तो १ जुलै २०१६ रोजी भारतातून पळाला असून एनआयएने १८ नोव्हेंबर २०१६ रोजी त्याच्यावर मुंबईत गुन्हा दाखल केला होता. त्याची मुंबईत इस्लामीक रिसर्च फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था असून ती बेकायदा असल्याचे गृह मंत्रालयाने जाहीर केले आहे. नाईक याला सौदी अरेबियाने नागरिकत्व दिल्याचे बोलले जाते पण त्याला दुजोरा मिळालेला नाही. वादग्रस्त धर्मप्रसारक असलेला नाईक हा व्यवसायाने डॉक्टर आहे , त्याला पकडण्यासाठी एनआयएची मदत घेतली जात असून त्याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन व पीस टीव्ही या संस्थांविरोधात धार्मिक विद्वेष पसरवल्याचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. त्याच्या या संस्थेवर बंदी घालण्यात आली असून पीस टीव्हीचे प्रक्षेपण बंद करण्यात आले आहे. न्पासपोर्टही रद्द केला आहे. चौकशीत सहभागी होण्यासाठी नाईक याला  नोटिस देण्यात आली होती पण तो उपस्थित झाला नाही. २१ एप्रिल रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी त्याच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.