पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी तीन दशकांच्या वैमनस्यातून आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा जळजळीत आरोप पाकिस्तानातील ‘मॅरियट’ आणि ‘पर्ल कॉण्टिनेण्टल’ साखळी हॉटेलचे मालक सद्रुद्दीन हाशवानी यांनी केला.
‘ट्रथ ऑलवेज प्रिव्हेल्स’ या आपल्या पुस्तकात हाशवानी यांनी कराचीतील ‘मॅरियट’ हॉटेलमध्ये १९८३ मध्ये झरदारी यांच्यासमवेत उडालेल्या खटक्याचा संदर्भ दिला आहे. या हॉटेलच्या ‘डिस्कोथेक’मध्ये जो खटका उडाला त्यामुळे झरदारी यांच्यासमवेत कायमचे वैमनस्य निर्माण झाले, असे हाशवानी यांनी म्हटले आहे. या २४८ पानी पुस्तकात झरदारी यांच्या विरोधात अत्यंत जहाल भाषा वापरण्यात आली असून त्यांच्यावर अनेक आरोपही करण्यात आले आहेत. झरदारी यांच्या मनात अद्यापही त्या घटनेबद्दल राग आहे, त्यामुळे त्यांनी आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्नही केला, असे हाशवानी यांनी म्हटले आहे.
‘मॅरियट’वर २००८ मध्ये बॉम्बहल्ला झाला त्यामध्ये ५४ जण ठार झाले आणि २०० हून अधिक जखमी झाले. तो हल्ला तालिबान अथवा कोणत्याही दहशतवादी संघटनेने केला नव्हता. तर हा हल्ला राजकीय हेतूने करण्यात आला होता आणि आपल्याला ठार मारण्याचा हेतू होता, असेही हाशवानी यांनी गुप्तचर यंत्रणेतील एका अज्ञात मित्राला हवाला देऊन म्हटले आहे. तथापि, हाशवानी यांनी याबाबत माजी अध्यक्षांवर थेट आरोप केलेला नाही.
पाकिस्तानमध्ये २००८ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर झरदारी अध्यक्ष होते आणि २००८ ते २००९ या कालावधीत आपल्याला ठार करण्याचे पाच वेळा प्रयत्न करण्यात आले, असा आरोपही पुस्तकात करण्यात आला आहे. आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी १९९० मध्ये आपल्याला कराचीहून इस्लामाबादला स्थलांतर करावे लागले, असेही त्यांनी म्हटले आहे.