बेनझीर भुत्तो यांच्या हत्येप्रकरणी फरार घोषित केल्यानंतर आता पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. बेनझीर यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा पीपल्स पार्टी ऑफ पाकिस्तानचे नेते आणि त्यांचे पती आसिफ अली झरदारी यांना झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. यासंबंधी त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ टाकत झरदारी यांच्यावर आरोप केले आहेत.

पाकिस्तानच्या न्यायालयाने माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येप्रकरणी परवेज मुशर्रफ यांना फरार घोषित केले आहे. आपल्या व्हिडिओत मुशर्रफ यांनी आसिफ अली झरदारी यांना बेनझीर यांच्या हत्येप्रकरणी जबाबदार ठरवले आहे. बेनझीर आणि मुर्तजा भुत्तो यांच्या हत्येत त्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला. जेव्हाही कोणाची हत्या होते. तेव्हा हे पाहिलं पाहिजे की याचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार आहे, असे ते म्हणाले होते.

मला या प्रकरणात सर्व गमवावे लागले आहे. मी सत्तेत होतो आणि हत्याकांडामुळे माझ्या सरकारला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले. फक्त एकाच व्यक्तीचा यामुळे फायदा होणार होता. ती व्यक्ती म्हणजे आसिफ अली झरदारी असे ते म्हणाले.

झरदारी पाच वर्षे सत्तेत होते. मग त्यांनी त्यावेळी या प्रकरणाची चौकशी का केली नाही. तपास का थंडावला होता, असा सवाल करत ते बेनझीर हत्याकांडात सामील होते, म्हणूनच कदाचित त्यांनी असं केलं असेल, असे त्यांनी म्हटले. पुराव्यावरून या प्रकरणात बैतुल्ला मसूद आणि त्याच्या लोकांचा समावेश होता हे स्पष्ट होते. पण त्यांना हे करण्यासाठी कोणी सांगितलं होतं. ती व्यक्ती मी असू शकत नाही. कारण तो समूह माझा व मी त्यांचा तिरस्कार करतो, असे त्यांनी या वेळी सांगितले.