आपल्या राज्यघटनेत कुठेही हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा उल्लेख नाही, पण काही  लोक तसा दावा करतात. ज्यांचे हिंदीवर प्रेम आहे त्यांनी हिंदी दिनाचा फार्स बंद करून भाषा दिनाच्या उपक्रमास पाठिंबा द्यावा, कारण त्यामुळेच हिंदीचे महत्त्व टिकून राहणार आहे. हिंदूी भाषा दीर्घकाळ राहावी यासाठी हिंदीची आंधळी भक्ती करून उपयोगाचे नाही, तर ती भाषा वापरणे हेच ती टिकवण्याचे खरे साधन असते.

राजभाषा समितीचा आणखी एक अहवाल सादर झाला. पुन्हा एकदा भाषेचा उमाळा दाखवत शिफारशी केल्या गेल्या, त्या मान्य केल्या गेल्या. पुन्हा एक मूक सार्वत्रिक चर्चा सुरू झाली. तोच खेळ पुन्हा एकदा सुरू आहे व त्याची फलश्रुतीही वेगळी नसणार हे उघड दिसतेच आहे. एक तर ते सगळे कागदावर राहील, म्हणजे कुठल्या वादाला तोंड द्यायला नको. फार तर हिंदी विरुद्ध इतर भारतीय भाषा असा वादविवाद होत राहील. मी तर या निष्कर्षांप्रत आलो आहे की, हिंदी ही राजभाषा करणे वायफळ व घातक आहे, कारण आपला हिंदी भाषेच्या प्रसाराबाबतचा अनास्थेचा अधिकृत दृष्टिकोन पाहिला तर कुणाचेही मत असेच होईल. काही वर्षांपूर्वी मी असे म्हटले होते की, १४ सप्टेंबर हा हिंदी दिन साजरा करणे बंद करावे. भारत सरकारच्या हिंदीला राजभाषेचा दर्जा देण्याच्या या वेगळ्या कामगिरीमुळे जगातील चौथी मोठी भाषा असलेली हिंदी धोक्यात असलेल्या भाषांच्या पातळीवर गेली आहे. जगात मँडरिन (चिनी भाषा), स्पॅनिश, इंग्रजी या पहिल्या तीन क्रमांकांच्या भाषा मानल्या जातात. हिंदी दिवस हा आपल्या देशाच्या भाषेच्या प्रांतातील चुकीच्या धोरणांचे प्रतीक आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. त्यासाठी हिंदी दिवस साजरा करणे पहिल्यांदा बंद केले पाहिजे.

ही सूचना कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल. माझ्यासारख्या हिंदीवाल्याकडून अशी अपेक्षा तुम्हाला नसेल हे मी जाणून आहे. माझे मित्र याला हरकतीही घेतील. ते कदाचित असे म्हणतील की, आपण हिंदीच्या प्रसारासाठी काही तरी केले पाहिजे. केवळ अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्याने काही साध्य होणार नाही, हे खरे असले तरी तशी मान्यता निदान पूरक तरी ठरू शकते. त्यांच्या या मताशी मी तरी असहमत आहे. मला वाटते की, हिंदीच्या परिघाभोवती जे वातावरण आहे ते त्या भाषेचे इंग्रजीच्या तुलनेत दुय्यमत्व अधिक घट्ट करत जाणारे आहे. अतिशय वाईट अशी ही स्थिती असून त्यामुळे हिंदीचे इतर भारतीय भाषांशी असलेले नाते संपत चालले आहे. हिंदीच्याच बोलीभाषांशी तिचे नाते धोक्यात आहे. खरे तर या बोलीभाषेतून हिंदीला जोम आणि जोरकसपणा मिळत असतो. तिच्यातील सर्जनशील आविष्करणाची ताकद वाढत असते, पण आता नेहमी घडणाऱ्या या गोष्टी मागे टाकून आपण हिंदी भाषेला पुढे नेले पाहिजे. हे का आणि कसे करायचे हे मी आता सांगणार आहे. हिंदूीला एकदा का राजभाषेचा दर्जा दिला किंवा तसा टिळा लावला की तिचे खरे स्थान शिल्लकच उरत नाही. आता याची सत्यता पटवण्यासाठी तुम्हाला सभोवार पाहावे लागेल.

झटपट इंग्रजी बोलणे शिकवणाऱ्या वर्गाच्या जाहिराती सगळीकडे दिसतात. देशात  इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले आहे. मोडकेतोडके इंग्रजी बोलण्याची केविलवाणी धडपड करीत व्यक्त होण्याचा अट्टहास अनेक ठिकाणी दिसतो. यातून भाषांची चढती भाजणी लक्षात येते. त्यांची क्रमवारी पाहून, व्यवहारातील स्थान पाहून हे सगळे केले जाते. ज्यांना काही करायचे आहे, ज्यांच्या काही आशाआकांक्षा आहेत त्यांच्यासाठी इंग्रजी भाषा आहे व ज्यांना कुठले पर्याय नाहीत त्यांच्यासाठी हिंदी उरली आहे. यूपीएससीच्या सी-सॅट पेपरमध्ये अखेर इंग्रजीनेच बाजी मारली. आपली वसाहतवादी मनोवृत्ती भावी सनदी अधिकाऱ्यांची इंग्रजी भाषिक क्षमता शोधत असते, त्यात त्या व्यक्तीला इंग्रजीतले त्याच्या भाषेत समजणेही आवश्यक असते. त्याला इंग्रजीतून भाषांतर करणे जमले पाहिजे असे या परीक्षेत अपेक्षित धरले आहे. हा सगळा प्रकार म्हणजे राष्ट्रीय घोटाळ्याइतकाच गंभीर आहे. सरकारने या यूपीएससी परीक्षेत इंग्रजीचे घोडे पुढे दामटले आहे. इंग्रजी ही शक्ती व अधिकार प्रदान करणारी भाषा आहे. या दृष्टिकोनातून पाहिले तर हिंदीचे भवितव्य इतर भारतीय भाषांपेक्षा वेगळे कसे असेल? हिंदी भाषेला विशेष दर्जा दिल्याने उलट तिच्या इतर भाषांशी नात्यांवर ताणाचे सावट आहे.

आपल्या राज्यघटनेत कुठेही हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा उल्लेख नाही; पण काही हिंदी भाषक लोक तसा दावा करतात. हिंदी मोठी भाषा आहे; पण ती जुनी भाषा नाही व आधुनिक भारतीय भाषांप्रमाणे समृद्धही नाही. अहिंदी भाषकांना शाळेत जुजबी हिंदी शिकावे लागते, पण हिंदी भाषक लोक इतर आधुनिक भारतीय भाषा शिकण्यापासून सुटका करून घेतात. सरकारी हिंदी ही मूळ हिंदी भाषेची तिच्या बोलीभाषांशी असलेली मुळे कापून तिला भाषिक व सांस्कृती वारशापासून दूर ठेवीत आहे. हिंदूीत अनेक बोलीभाषा आहेत. उर्दू व हिंदी यांच्यातील दरीही अशीच वाढवली गेली. हिंदूी भाषा मरण पावली किंवा मरणासन्न अवस्थेत आहे अशी स्थिती नाही. उलट अनेक क्षेत्रांत ती वेगाने पसरते आहे. मुंबईची चित्रपटसृष्टी, क्रिकेट समालोचन, हिंदी प्रसारमाध्यमे यांनी हिंदीला जिवंत ठेवले आहे. समकालीन हिंदी वाङ्मय हे आजच्या आधुनिक भाषातील वाङ्मयाच्या तोडीस तोड असून ते टिकून आहे.

हिंदीला साहित्य समीक्षेची चांगली परंपरा आहे व समाजशास्त्रातील ज्ञानही हिंदीत आहे; पण हे सगळे आहे त्याचे कारण हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा असणे मुळीच नाही. हिंदूी दिवस बंद करण्याची सूचना मी वर मांडली आहे त्यामुळेच त्याला पर्याय म्हणून मला असे वाटते की, आपली भाषिक विविधता व संपन्नता टिकवण्यासाठी भाषा दिवस साजरा करावा. त्याने विविध भारतीय भाषांचे नाते अधिक दृढ होईल, पण सरकारी व्यवस्था तसे करायला तयार नाही. हिंदीचे प्रतीकत्व पुढे करणे त्यांना सोयीचे आहे. ज्यांचे हिंदीवर प्रेम आहे त्यांनी हिंदी दिनाचा फार्स बंद करून भाषा दिनाच्या उपक्रमास पाठिंबा द्यावा, कारण त्यामुळेच हिंदीचे महत्त्व टिकून राहणार आहे. हिंदूी भाषा दीर्घकाळ राहावी यासाठी हिंदीची आंधळी भक्ती करून उपयोगाचे नाही, तर ती भाषा वापरणे हेच ती टिकवण्याचे खरे साधन असते. उपयोजित व नेहमीच्या वापरातील हिंदी शब्दांचा कोश तयार करणे गरजेचे आहे. केवळ अधिकृत छापाचे शब्दकोश उपयोगाचे नाहीत. हिंदीने तिच्या बोलीभाषांसह इंग्रजी व इतर भाषांतून शब्द घेतले तरच ती संपन्न होईल. तिचे शब्दसामथ्र्य शतगुणित होईल. नवीन पिढीशी नाळ जोडण्यासाठी आपण मुले व प्रौढांसाठी हिंदी साहित्य निर्माण केले पाहिजे. गुलजार यांची ‘बोस्की का पंचतंत्र’ व सुकुमार राय यांचे ‘अबोल तबोल’ यांसारखी पुस्तके त्याचा नमुना आहेत. हिंदूीत उच्च दर्जाची क्रमिक पुस्तके महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी लिहिली गेली पाहिजेत. चिनी व जपानी भाषेप्रमाणे हिंदी ही इंटरनेटस्नेही भाषा बनली पाहिजे. हिंदीतून इतर भाषांत व इतर भाषांतून हिंदीत भाषांतराचा मोठा कार्यक्रम उच्च दर्जा ठेवून राबवला पाहिजे. इतर भाषांतील साहित्य साधने हिंदीत उपलब्ध झाली पाहिजेत.

हिंदीने उर्दूतील शेरोशायरीबरोबरच इतरही काही गुण अंगीकारणे गरजेचे आहे. तामिळसारखी अभिजात भाषा, मल्याळमधील मुद्रण संस्कृती, कन्नडातील समकालीन साहित्य, मराठीतील विद्रोही साहित्य व बंगालीतील शैक्षणिक व विद्वत्ताप्रचुर लेखन यातून हिंदीला बरेच काही घेण्यासारखे आहे. हिंदीला केवळ कुठल्या तरी प्रकारचा सरकारी छाप दर्जा देऊन तिचा प्रसार करण्याऐवजी तिला तिच्या नैसर्गिक शैलीने वाढू द्या. त्यातूनच विविध समुदाय व भाषा यांच्यातील पूल कुठलाही गाजावाजा न करता नकळत उभे राहतील, त्यावरून जाणारे वाटसरूच हिंदीची ध्वजपताका उंचावतील.

योगेंद्र यादव

yywrites5@gmail.com