पहलू खानची आई तिच्या एकुलत्या एक मुलाच्या आठवणीने हमसून हमसून रडत होती. सांत्वनेचे शब्दही त्यापुढे फिके पडत होते. हे सगळे पाहून ऐंशी वर्षांपूर्वीच्या त्या घटनेची आठवण मला आली. तेव्हा पहलूची आई जन्माला आली असेल, तो काळ डोळ्यांसमोरून सरकू लागला. १९३६ मध्ये हिस्सारमध्ये बकरी ईदच्या वेळी गाईचा बळी दिल्याने दंगा झाला होता. त्या दंग्यात माझे दादाजी मास्टर राम सिंह यांची हत्या झाली होती. पहलूची आई डोळ्यासमोरून जात नव्हती व त्याच वेळी फैज यांच्या ‘खून के धब्बे धुलेंगे कितनी बरसातों बाद’ या ओळी आठवत होत्या.

मी गोरक्षणाचा समर्थक आहे. आमच्या भागात बरेच लोक गाईला पवित्र मानतात. वैदिक काळातही गाईचे मांस सेवन केले जात होते, पण आज काही हिंदूंचे धार्मिक संस्कार हे गोमांस भक्षणाविरोधात आहेत. मांसभक्षण करणारे लोकही गाईचे मांस खात नाहीत. इतर धार्मिक संस्कारांप्रमाणे गोमांस भक्षण न करणे हा एक चांगला विचार आहे. यात मानवी संवेदना आपल्या किंवा मानव जातीच्या रक्षणापुरती मर्यादित न ठेवता ती पाळीव पशूबाबत ठेवणे हा उत्तमच विचार म्हटला पाहिजे. जर गाय या पशुसंवर्धनाच्या आदर्शाचे प्रतीक बनत असेल तर त्यात खरे तर कुणाला काय आक्षेप किंवा अडचण असावी.

जर हिंदू धर्म गोहत्या करू नये, असे सांगतो, तर मुसलमानांचा इस्लाम धर्म गाईला मारण्याचा आदेश तर नक्कीच देत नाही. कुराण शरीफमधील दुसरा सूरा हा गाईशी संबंधित गोष्टींवर आधारित आहे. हे खरे की, त्या धर्मात गोमांस पूर्णपणे वज्र्य मानलेले नाही, पण कुराण शरीफमध्ये दूध देणारी गाय, शेतीत काम करणारी गाय, वासरे, वृद्ध गाई यांना बळी देण्यावर प्रतिबंध आहे. हजरत महंमदाने गाय पाळली होती व गाय पाळण्याला इस्लाममध्ये सुन्नत म्हणजे धर्मासाठी चांगले काम मानले जाते. सत्य हे आहे की, पहलू खानसारखे गावात वास्तव्य करणारे मुसलमान शेतकरी अनेक शतकांपासून गोपालक आहेत. आजही हरयाणाच्या तुलनेत मुस्लिमांची जास्त संख्या असलेल्या मेवात जिल्ह्य़ात गाईचे पालन मोठय़ा प्रमाणावर होते. याचा अर्थ गोरक्षणाच्या मुद्दय़ावर खरे तर हिंदू-मुसलमान यांनी एकमेकांविरोधात उभे ठाकण्याचे काही कारण नाही. याच मुद्दय़ाच्या आधारे भारतीय राज्यघटनेत गोरक्षा धोरण हा एक मार्गदर्शक सिद्धांत ठरवला गेला. जर प्रामाणिक प्रयत्न केले तर गोरक्षणावर राष्ट्रीय मतैक्य होऊ शकते, पण त्यासाठी गोरक्षण समर्थकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की, आपल्याला यात गाईचे रक्षण करायचे आहे की मुसलमानांची शिकार करायची आहे.

आपला खरा हेतू जर गोरक्षणाचा असेल तर आपल्याला कटू सत्यास सामोरे जावे लागेल. आज जे लोक गाईचे मांस खातात त्यांच्यापासून गाईला मोठा धोका नाही, तर गाईच्या प्रतिमेची पूजा करणाऱ्यांपासून खरा धोका आहे. कटुसत्य हे आहे की, गाईच्या बाबतीत हिंदू समाजाचा दृष्टिकोन दांभिकतेचा आहे. केवळ म्हणायला आपण गाईला माता म्हणतो, तिला कुंकवाचा टिळाही लावतो, तिच्या नावावर भांडणेही करतो; पण गाईला वाचवण्यासाठी आपण काहीच करीत नाही. भारतातील अनेक शहरांत आज हजारो गाई प्लास्टिक व इतर कचरा खातात. गेल्या वर्षी दुष्काळात अनेक गाई गावाबाहेर चाऱ्याच्या शोधात होत्या, तडफडून मरत होत्या. मी त्यावर लेख लिहिले, समस्या मांडल्या. गाईला वाचवण्याची जबाबदारी असलेला हिंदू समाज हा गाईंच्या आजच्या अवस्थेला जबाबदार आहे. दुसरे कटुसत्य असे की, केवळ जनावरांना कापणारा खाटीकच याला जबाबदार आहे असे नाही. गोहत्या रोखण्याची जबाबदारी गोपालकांची आहे. गाय दूध देईनाशी झाली की ते गाय विकून टाकतात व वासरांना सोडून देतात. या सगळ्या प्रक्रियेत अनेक दलाल येतात जे गाईला कत्तलखान्यापर्यंत नेण्यास जबाबदार असतात. यात शेवटचा टप्पा असतो तो कत्तलखान्याचा, जिथे हजारो गाई कापून त्यांचे मांस निर्यात केले जाते. त्यात अधिक लोक हे मुसलमान नव्हे तर हिंदू आहेत. तिसरे कटुसत्य असे की, गोमांसावर कायदेशीर प्रतिबंध लावून काहीच फायदा नाही. देशातील अनेक राज्यांत गोहत्याबंदी असूनही गाय पाळण्यास अक्षम असलेले शेतकरी गाई विकून टाकतात. गोरक्षणाची व्यवस्था नीट केल्याशिवाय गोमांस बंदी करणे म्हणजे प्रत्येक स्वयंपाकघरात पोलीस निरीक्षकांच्या घुसखोरीस म्हणजे इन्स्पेक्टर राजला परवानगी देण्यासारखे होईल. अखलाक  प्रकरणासारख्या घटना त्यामुळे रोज घडत राहतील. जर गोरक्षेची व्यवस्था केल्यानंतर गोहत्येविरोधात राष्ट्रीय सहमती घडवली तर ते योग्य होईल. हिंदू नसलेले लोकही त्याला मान्यता देतील, पण आधी हिंदू समाजाने आपली जबाबदारी पार पाडावी.

जर गोरक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन मुस्लिमांना लक्ष्य बनवण्याचा असेल तर ते योग्य नाही. त्यासाठी आत्मपरीक्षण गरजेचे आहे. देशात २५ कोटी हिंदू कुटुंबे आहेत व १२ कोटी गाई आहेत. जर गाईची पूजा करणारे प्रत्येक कुटुंब एकेक गाय पाळेल व दूध न देणाऱ्या भाकड गाईचीही सेवा करील तर गोरक्षण आपोआप होईल. आज शेतकऱ्यांची परिस्थिती ते गाय व तिच्या वासरांना पाळू शकतील अशी नाही. जे लोक गाय पाळू शकत नाहीत अशांनी गोशाळांना पैसे दिले तर गाई वाचतील. सरकारी पातळीवर गोशाळांना अनुदान मिळाले तर त्याला काही हरकत नसावी, पण यात मुख्य जबाबदारी समाजाची आहे असे मला वाटते. पहलू खानची आई गोसेवेस तयार आहे. गोरक्षणाच्या प्रयत्नात शहीद झालेले माझे दादाजी आज असते तर त्यांनी ही जबाबदारी आनंदाने घेतली असती, पण गाई केवळ टीव्हीच्या पडद्यावर पाहणारे ढोंगी गोरक्षक मात्र या जबाबदारीपासून पळ काढतील यात मला शंका वाटत नाही.

– योगेंद्र यादव

yywrites5@gmail.com