मोदी सरकार सत्तेवर आले, त्याला तीन वष्रे पूर्ण झाली. या तीन वर्षांतील काही मूलभूत सत्ये मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कुठल्याही सत्यापासून पळ काढणे हा आपल्या राजकारणाचा स्थायिभाव आहे. भाजपप्रणीत एनडीए सरकारच्या तीन वर्षांच्या कारभारानंतर पहिले सत्य सामोरे येते ते म्हणजे नरेंद्र मोदी आज पूर्ण देशात लोकप्रिय पंतप्रधान आहेत. दुसरे सत्य म्हणजे त्यांची लोकप्रियता ही त्यांचे काम किंवा त्याची फलश्रुती यामुळे नाही, तर केवळ त्यांच्या प्रतिमेवर म्हणजे करिश्म्यावर आधारित आहे. तिसरे सत्य असे, की त्यांची जी प्रतिमा बनली आहे ती केवळ प्रसारमाध्यमांच्या मेहेरबानीने काही प्रमाणात तयार झाली आहे, पण ती विरोधकांच्या वैचारिक व राजकीय दिवाळखोरीमुळे अधिक झळाळून उठली आहे.

गेल्या काही दिवसांत मोदी सरकारची तीन वष्रे पूर्ण झाल्यानंतरच्या कामगिरीचे पाहणी अहवाल आले आहेत. त्यात लोकप्रियता हा एक मुद्दा आहे. त्या सर्व पाहणी अहवालांवर नजर टाकली तर प्रत्येकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचे मोजमाप करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. सर्वानी यावरही अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला आहे. तो असा, की आज जरी लोकसभा निवडणुका झाल्या तर कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील. त्याचे उत्तर अर्थातच सत्ताधारी पक्षाला अपेक्षित होते तेच आहे. एके काळी मीही असे पाहणी अहवाल तयार करण्याचे काम करीत असे, त्यामुळे मला त्यातील बऱ्यापकी कळते असा दावा मी करू शकतो. त्याआधारे मला असे वाटते, की निवडणुकांच्या दोन वष्रे आधी त्यांच्या निकालांबाबत काही भविष्यवाणी करणे किंवा अंदाज करणे फारसे गांभीर्याने घेण्याचे कारण नाही; पण जनमताचा कानोसा व हवेची दिशा सांगण्यासाठी हे पाहणी अहवाल उपयोगी असतात यावर मी सहमत आहे. वेगवेगळ्या पाहणी अहवालांत थोडाफार फरक जरूर आहे, त्यामुळे मी यात सर्वात विश्वसनीय पाहणी अहवालाचा आधार या विवेचनात घेतला आहे. जीएसडीएस-लोकनीती या संस्थेने केलेला पाहणी अहवाल मला विश्वासार्ह वाटतो.

सर्व पाहणी अहवाल हे दाखवत आहेत, की तीन वर्षांपूर्वी अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर आताही नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची लोकप्रियता कायम आहे, एवढेच नव्हे तर ती तेव्हापासून आठ टक्क्यांनी वाढली आहे. २०१४ मधील राजकीय कामगिरीच्या तुलनेत भाजपने ओदिशा व बंगालमध्येही आघाडी घेण्यास सुरुवात केली आहे. पण सत्य हे आहे, की यूपीए सरकारेसुद्धा तीन वर्षांनंतर लोकप्रियच होती. मोदी सरकारची लोकप्रियता ही मनमोहन सिंग सरकारपेक्षा अधिक आहे, इतकाच आता झालेला फरक आहे. नोटाबंदीमुळे मोदींची लोकप्रियता कमी होण्याऐवजी वाढली, ही वेगळी बाब आहे.

जर भाजपविरोधी पक्ष पहिल्या सत्यापासून तोंड फिरवतील, तर भाजपसमर्थक दुसऱ्या सत्यावर स्वार होतील, अशी परिस्थिती आहे. मोदी लोकप्रिय आहेत तर त्यांच्या सरकारने नक्कीच काही दमदार काम करून दाखवले असावे, त्यांची कामगिरी मोठी असावी; पण प्रत्यक्षात तसे नाही. मोदी सरकारने निवडणुकीतील आश्वासने वाऱ्यावर सोडली आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा जास्त दर, प्रत्येक युवकाला रोजगार, महिलांना सुरक्षा, भ्रष्टाचाराला मूठमाती, शिक्षण व आरोग्य सुविधांत वाढ असे मोठे वादे भाजपने निवडणुकीत केले होते, पण या सरकारच्या अतिशय नावाजलेल्या योजनाही त्यांच्या लक्ष्यपूर्तीच्या जवळपास नाहीत. स्वच्छ भारत अभियान, मेक इन इंडिया, पीक विमा योजना हे सगळे काही ठीक आहे पण अपेक्षित यश त्यात आलेले नाही. मोदींना लोकप्रिय ठरवणारा पाहणी अहवाल हेही सांगतो, की देशात या घडीला बेरोजगारीची चिंता मोठी आहे. लोकांचे म्हणणे आहे, की नोकरीच्या संधी तीन वर्षांत कमी झाल्या आहेत. शेतकऱ्यांची अवस्था पूर्वीपेक्षा वाईट आहे.

प्रश्न अशा आहे, की ठोस काही हाती लागले नसतानाही मोदी सरकार इतके लोकप्रिय का आहे, मोदी विरोधकांच्या मते याचे कारण माध्यमांनी मोदींची प्रतिमा तयार करण्यास मदत केली. या दाव्यात काही प्रमाणात सत्य आहे. आज देशाची प्रसारमाध्यमे ज्या पद्धतीने मोदी महिमा गात आहेत, तसा गाजावाजा राजीव गांधी यांच्या राजवटीतील पहिल्या एक-दोन वर्षांनंतरही कधीच झाला नाही. देशातील प्रसारमाध्यमांवर सरकारचे जेवढे नियंत्रण आता आहे तेवढे आणीबाणीतही नव्हते. प्रसारमाध्यमे मोदींची पूजा करण्यात गढले आहेत. मोदींची कुठलीही कमजोरी झाकण्यास ते तत्पर आहेत व भाजपच्या इशाऱ्यावर विरोधी पक्षांविरोधात प्रहार करण्याच्या मोहिमा राबवत आहेत. सोनियांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या दुष्कर्माचा पर्दाफाश करण्यास माध्यमे सरसावली आहेत, पण बिर्ला सहारा डायरी प्रकरणात त्यांची सगळी अळीमिळी गुपचिळी आहे. प्रसारमाध्यमे तोंडात मूग गिळून बसले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याविरोधात कपिल मिश्रा यांच्या प्रत्येक आरोपावर प्रसारमाध्यमांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत व ते सगळे मोठे करून दाखवले जाते, पण त्यापेक्षा मोठय़ा घोटाळ्यांवर त्यांची दातखीळ बसली आहे. इतकी पाळीव प्रसारमाध्यमे कधीच कुठल्या पंतप्रधानाच्या नशिबी आली असतील. मोदी यांची प्रतिमा केवळ प्रसारमाध्यमांनी बनवलेली नाही. जर माल विकाऊ नसेल तर चांगली जाहिरात करून काही उपयोग नसतो, तो माल फार काळ विकला जात नाही. त्यामुळे मोदी यांच्या यशस्वितेचे गुपित विरोधी पक्षांचा नाकर्तेपणा हे आहे. विरोधकांच्या निष्क्रियतेमुळे मोदी लोकप्रिय आहेत. जेव्हा मोदी यांची तुलना राहुल गांधी यांच्याशी केली जाते, तेव्हा तर मोदींचीच छबी उजळून निघणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

सीएसडीएसच्या पाहणी अहवालात असे दिसते, की जर लोकांना तुम्ही कुठलेही पर्याय न सांगता पसंत असलेल्या पंतप्रधानाचे नाव विचारले तर ४४ टक्के लोक मोदींचे नाव घेतात इतकी त्यांची लोकप्रियता आहे. त्यांच्यानंतर राहुल गांधी यांना ९ टक्केमते मिळाली आहेत. राहुल, सोनिया, मनमोहन हे सगळे मिळून १४ टक्क्यांपर्यंत कसेबसे पोहोचतात. तीन वर्षांपूर्वी हा फरक थोडा कमी होता. मोदी यांची लोकप्रियता ३६ टक्के, राहुल, सोनिया व मनमोहन यांची मिळून १९ टक्के होती व कोणताही विरोधी पक्षनेता लोकप्रियतेत ३ टक्क्यांच्या वर जाऊ शकत नव्हता. दोन वर्षांपूर्वी अरिवद केजरीवाल यांची लोकप्रियता ६ टक्क्यांपर्यंत होती, पण आता त्यांची एवढी बदनामी झाली आहे, लोकप्रियतेच्या त्या छोटय़ा टेकडीवरूनही ते घसरले आहेत. आता त्यांची लोकप्रियता एक टक्काही नाही.

आज राजकारणात एका शून्याच्या अंधारात मोदींचा तारा चमकतो आहे. मोदी सक्रिय आहेत. विरोधी पक्ष प्रतिक्रिया देण्याच्या अवस्थेपुरते मर्यादित आहेत. मोदी सकारात्मक आहेत तर विरोधी पक्ष नकारात्मक आहेत. विरोधी पक्ष गरसमजांचे शिकार आहेत तर मोदींचा फुगा एक दिवस फुटणार आहे. त्यांच्या मते केवळ मोदींचा विरोध करूनच मोदींचा मुकाबला केला जाऊ शकतो. त्यांचे धोरण मोदीविरोधी महाआघाडीपुरते मर्यादित आहे. मला असे वाटते, की मोदी विरोधकांनी इतिहास वाचलेला नाही. आज आपल्या लोकशाहीची विटंबना होते आहे ती सत्ताधारी पक्षाचा अहंकार ही नसून विरोधकांची दिवाळखोरी ही आहे.

 

योगेंद्र यादव

yywrites5@gmail.com

लेखक स्वराज  इंडियाचे अध्यक्ष आहेत.