बापू,

मी तुम्हाला तुमच्या जयंतीलाच हे पत्र तुमच्याच आश्रमातून लिहीत आहे. शंभर वर्षांपूर्वी तुम्ही चंपारण सत्याग्रहाच्या वेळी  भितिहरवा  येथे एक केंद्र म्हणून हा आश्रम एका कुटीत सुरू केला होता. हा आश्रम आजही जसाच्या तसा आहे. अजून त्याला काँक्रीट व संगमरवराचं आधुनिक कोंदण लाभलेलं नाही. या आश्रमात तुमची साधनशुचिता आजही प्रत्ययास येते. चंपारण सत्याग्रहाच्या वेळी तुम्ही केलेल्या सत्याग्रहाच्या निमित्ताने संग्रहालय तर बनवण्यात आले, पण मला त्याचे महत्त्व वाटत नाही. तुमच्या छबीत जो जिवंतपणा आहे तो या कशातच नाही; पण संग्रहालयातील वस्तूंबाबत असे म्हणणारा मी तरी कोण, असे तुम्हाला वाटेलही.

तुमच्या या कुटीवजा आश्रमाची इमारत तर तशीच आहे, पण त्यात जिवंतपणा आहे की नाही हे सांगणे मुश्कील आहे. गेल्या वर्षी तुमच्या जयंतीनिमित्त याच आश्रमात सरकारने बराच गाजावाजा करीत काही कार्यक्रम केले होते, असे मी ऐकून आहे. त्या वेळी सरकारने एक, तर विरोधी पक्षांनी एक असे गांधीजींच्या रूपातील दोन बहुरूपी तेथे आणले होते. या वेळी मात्र सरकार तुमच्या जयंतीला या आश्रमास विसरून गेले; पण तेथे जिल्हाधिकारी येणार होते, असे ऐकले. आश्रमात सूर्यप्रार्थना चालू होती. वातावरण मात्र काहीसे थकले-भागलेले, विझलेले होते.

बापू, तुमच्या सत्याग्रहाचा आत्मा अजूनही आश्रमाच्या चार भिंतींबाहेर जिवंत आहे, असे तिथे जे मी पाहिले त्यावरून वाटते. कारण तेथे जवळच एका ठिकाणी स्थानिक प्रश्नांवर उपोषण सुरू होते. तेथील लोक संघर्ष समितीचे पंकजजी भेटले होते, त्यांच्याशी बोललो. त्या भागात अनेक भूमिहिनांना जमिनीची मालकी मिळवून देण्यासाठी ते अहिंसक मार्गाने संघर्ष करीत होते. मला वाटते, जर आज तुम्ही असतात तर कुठल्या औपचारिक कार्यक्रमात सहभागी न होता तुम्ही या भूमिहिनांच्या संघर्षांत झोकून दिले असते. तिथेच शेतकरी आंदोलनाचा तंबूही पडला होता. अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या झेंडय़ाखाली आम्ही किसान मुक्ती यात्रा तेथे घेऊन आलो होतो. चंपारण सत्याग्रहाच्या निमित्ताने तुम्ही त्या वेळी देशातील शेतक ऱ्यांच्या अवस्थेबाबत जे काही सांगितले होते त्याची आठवण आज होते आहे. निळीची शेती करणारा शेतकरी हा अनेक बंधनांनी बद्ध होता, त्या वेळी शेतकरी हा गुलामच होता. तेथे बसून मी विचार करू लागलो, की चंपारणमधील शेतकरी आजही बंधनांनी करकचून बांधला गेलेला नाही का, आजही भारतातील शेतकरी गुलामाचे जीवन जगत नाहीत का..

बापू, चंपारणचा शेतकरी आज सांगतो आहे, की निळीच्या जागी आता साखर कारखाने आले. निळीचे जमीनदार तर गेले, पण आता साखर कारखान्यांची जमीनदारी सुरू आहे. चंपारण भागात आता जमिनीची मालकी एकरात नाही, तर किलोमीटरमध्ये मोजली जाते. राजेरजवाडे, कंपन्या यांच्याकडे अनेक किलोमीटर जमीन आहे. आजही जमीन कसणारे लाखो शेतकरी त्यातील मिळकतीपासून वंचित आहेत. उसाची शेती करणारा शेतकरी कारखान्यांच्या जोखडाला जुंपला गेला आहे. शेजारच्या उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादकांना जेवढा पैसा मिळतो तेवढाही या शेतक ऱ्यांना मिळत नाही. आजही शेतकरी बंदिवानच आहे, फक्त निळीची जागा साखरेने घेतली आहे. जमीनदारांच्या भूमिकेत साखर कारखाने आहेत, तर इंग्रजांच्या जागी निर्वाचित सरकार आहे.

बापू, ही केवळ चंपारणच्याच शेतक ऱ्यांची कहाणी नाही, तर देशातील बहुतांश सर्वच शेतक ऱ्यांची कहाणी आहे. भारतातील शेतकरी आजही गुलामीतच पिचत आहे. ज्या अर्थव्यवस्थेच्या खाचाखोचा माहीत आहेत तिचाच तो गुलाम आहे, पण त्यावर त्याचा कुठलाच अंकुश नाही. ज्या व्यवस्थेत शेतमालाचे भाव वाढत नाहीत, पण उत्पादन खर्च वाढत आहे त्या व्यवस्थेचा तो गुलाम आहे. उत्पादन खर्च तर निघत नाही, मग घरखर्च कुठून निघणार, अशी दुहेरी फरपट आहे. शेती आता आतबट्टय़ाचा धंदा झाली आहे; पण तो या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकत नाही, हा अभिशापच त्याला मिळालेला आहे. आज शेतकरी बँका, सावकार यांचा गुलाम आहे. त्यांच्या कर्जात तो आकंठ बुडाला आहे. तुमच्या जमान्यात शेतकरी कर्जात जन्माला येतो, कर्जात जगतो व कर्जातच मरतो, असे म्हटले जात असे. बापू, दुर्दैवाने आजही तीच परिस्थिती कायम आहे. केवळ कर्जाचे आकडे वाढले आहेत. सावकारांच्या जागी बँका आहेत. तुमच्या काळात मिठावरील कर व कर्जाने मेटाकुटीस आलेले गुलाम विद्रोह तरी करीत होते. आजचा गुलाम शेतकरी तेही करण्याच्या मन:स्थितीत नाही. त्यामुळे शेतकरी आता मोठय़ा प्रमाणात आत्महत्या करीत आहेत.

आजचा शेतकरी आधुनिक शेतीचा गुलाम आहे. गेल्या सत्तर वर्षांत शेतक ऱ्याला उपदेशाचे बरेच डोस दिले गेले. पूर्वजांसारखी शेती करणे सोडा, नवी पिके, संकरित बियाणे, रासायनिक खते, विषारी कीटकनाशके, पंपाचे पाणी यांचा वापर करा, असे त्यांना सांगितले जात आहे. सुरुवातीला काही कमाई होईल या मोहातून शेतकरी ही नवी शेती अंगीकारतातही; पण नंतर तेच अंगाशी येते. काही वर्षांत उत्पन्न कमी होत जाते. विहिरी कोरडय़ाठाक पडत जातात. नवीन असाध्य आजार डोके वर काढतात. बापू, ही एक गुलामीच आहे. हे सगळे पाहिले तर स्वातंत्र्यानंतर शेतकरी अधिकच गुलाम बनत गेला असे मला वाटते.

शेतकरी लोकनियुक्त सरकारांचा गुलाम आहे. म्हणायला तर देशात लोकशाही आहे, बहुमताचे सरकार आहे, शेतकरीही बहुमतात आहेत; पण लोकशाहीत शेतक ऱ्यांची अवस्था एका नोकरासारखी आहे. तलाठय़ासमोर हात जोडणे, तहसील कार्यालयात कामांसाठी टाचा घासत राहणे, बँक व्यवस्थापकाच्या कक्षेबाहेर भिकाऱ्यासारखे ताटकळत राहणे या अवस्थेमुळे आजचा शेतकरी ‘नागरिक’ नाही तर राजाच्या दयेवर चालणाऱ्या ‘प्रजे’च्याच अवस्थेत आहे.

संसदेतील किमान तीनशेहून अधिक खासदार आपण किसानपुत्र असल्याचे सांगतात, पण जी संसद कायदे करते त्यात शेतक ऱ्यांसाठीचे कायदेकानू तयार करण्याला अग्रक्रम नसतो. प्रत्येक सरकारकडे कंपन्यांना देण्यासाठी मलई आहे, पण शेतक ऱ्याला द्यायला फक्त दु:ख आहे. उद्योगांसाठी सरकारकडे बक्कळ पैसा आहे, पण शेतक ऱ्यांना संवादाचा सबुरीचा मार्ग दाखवला जातो. आपल्याला किसानपुत्र म्हणवणारे खासदार व मंत्री आंतरराष्ट्रीय व्यापारात शेतक ऱ्यांचे हित कवडीमोलाने विकत आहेत; पण त्यांना कोणी विचारणारा नाही, ही शोकांतिका आहे बापू, तुमच्या स्वतंत्र भारताची!

बापू, शेतक ऱ्यांना गुलामीतून बाहेर काढण्यासाठी तुम्ही चंपारणचा सत्याग्रह केलात, पण आजच्या  शेतकऱ्यांना स्वकीयांच्याच गुलामीतून बाहेर काढण्यासाठी कुठल्या प्रकारचा सत्याग्रह करावा हे समजत नाही. भितिहरवा आश्रमात चंपारण सत्याग्रहाचा इतिहास पाहिला, तर हा सत्याग्रह सतत संघर्ष व नवीन प्रयोगातून जन्म घेत गेला असे मला जाणवले. गेल्या तीन महिन्यांत मी किसान मुक्ती यात्रेच्या निमित्ताने तेरा राज्यांत गेलो होतो. त्यात    शेतक ऱ्यांशी हितगुज केले, त्यात शेतकरी पुन्हा एकदा त्याच्या स्वराज्याच्या (किसान स्वराज) संघर्षांसाठी सज्ज आहे असे मला जाणवत आहे.

२० नोव्हेंबरला आम्ही देशातील सगळे शेतकरी दिल्लीत जाऊन एक नवीन सत्याग्रहाचा उद्घोष करणार आहोत. तुम्ही असाल ना तिथे बापू.. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी.

भितिहरवा आश्रमातून पाय निघत नव्हता तरी बाहेर पडलो तेव्हा तुमच्या तीन माकडांवर माझी दृष्टी गेली. मला वाटले, तुम्ही त्या तीन माकडांबरोबर आता चौथे माकडही तेथे असल्याचे सांगत आहात. ‘वाईट पाहू नका’, ‘वाईट ऐकू नका’, ‘वाईट बोलू नका’ असे सांगणाऱ्या तीन माकडांबरोबरच आता ‘वाईट सहन करू नका’ असे सांगणारे माकडही आहे असे मला वाटून गेले. त्या माकडाची मूठ बंद आहे व हात आवेशाने हवेत उंचावलेले आहेत. मला वाटते बापू, तुमच्या या चौथ्या माकडाच्या रूपाने आमच्या शेतकरी स्वराज्याच्या आंदोलनास तुमचा आशीर्वाद मिळाला आहे असेच मी समजतो.

तुमचा,

योगेंद्र

 

योगेंद्र यादव

yywrites5@gmail.com