फ्लोलोरिडात दोन बाल गुन्हेगारांचा मृत्यू.. तुरुंगातल्या पाच अधिकाऱ्यांची बडतर्फी.. या घटनेच्या अनुषंगाने केलेल्या तपासामध्ये मोठय़ांच्या तुरुंगातल्या काही गंभीर मारामाऱ्या आणि काही खून या सगळ्यांच्या मुळाशी एक गोड पदार्थ आहे, ज्याचं नाव- हनी बन्स! हे हनी बन्स आहे तरी काय? हनी बन्स हा केक, पेस्ट्रीचाच एक प्रकार. साखर, मध यांचा भरपूर वापर करून केलेला स्वस्त आणि मस्त, पण आरोग्याला घातक असलेला खाद्यपदार्थ. अमेरिकेत चीप जंक फूडच्या प्रकारात समावेश असलेला आणि शाळा, महाविद्यालये, कार्यालयांच्या व्हेंडिंग मशीनमध्ये सहज मिळणारा, ५-६ दिवस शिळा न होणारा हा पदार्थ गार, गरम कसाही खाता येतो. खूप गोड आणि त्यामुळे झटकन एनर्जी देणाऱ्या हनी बन्स पेस्ट्रीज एखादी किंवा सहा अथवा बारा या प्रमाणात मिळतात. स्वस्त आणि पटकन पोट भरायला मदत करणाऱ्या या हनी बन्स पेस्ट्रीज कुठल्याही छोटय़ा दुकानातही (अगदी गॅस स्टेशनवरच्या कन्व्हीनिअन्स स्टोअरमध्येही) सहज मिळतात. दिवसाच्या कुठल्याही वेळेला खाता येणाऱ्या या हनी बन्स पेस्ट्रीज सध्या त्यांच्यामुळे होणाऱ्या वाईट घटनांमुळे चर्चेत आहेत.
एलॉर्ड हा १७ वर्षांचा आफ्रिकन-अमेरिकन मुलगा फॉस्टर होममध्ये राहत होता. पैशांसाठी लोकांपुढे हात पसरण्यापेक्षा स्वत: पैसे मिळवावेत असं त्याला वाटे. शिक्षण झालं नसल्याने पैसे मिळविण्याचा मार्ग लूटमार, चोऱ्यामाऱ्या हाच होता. वाईट संगत आणि पैसे मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणून रस्त्यावरच्या भुरटय़ा चोरांच्या यादीत पोलिसांना त्याचं नाव वारंवार दिसायला लागलं. त्याने आणि त्याच्या मित्रांनी पिस्तुलाचा धाक दाखवून एका म्हाताऱ्या गृहस्थाचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. एलॉर्डला मुलांच्या तुरुंगात पाठवलं. तुरुंगातल्या अधिकाऱ्यांना तो आपल्या वर्तणुकीने बराच त्रास देत असे. अधिकाऱ्यांनी त्याला वठणीवर आणायला एक रामबाण उपाय योजला. त्यांनी १४-१५ बाल गुन्हेगारांना हनी बन्सची लालूच दाखविली. ‘‘एलॉर्डला चांगलं ठोकून सरळ करा. प्रत्येकाला हनी बन्स मिळेल,’’ (एलॉर्डला हनी-बनिंग करा, असा बाकी मुलांना दिलेला तो ‘गोड आदेश’ होता.) असे फर्मानच सोडले. तुरुंगातल्या वास्तव्यात हनी बन्सला मुकलेली मुलं एलॉर्डवर तुटून पडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एलॉर्डला तुरुंगातल्या डॉक्टरांनी थोडीफार वैद्यकीय मदत दिली, पण तसा तो दुर्लक्षितच राहिला. दुसऱ्याच दिवशी त्याला तुरुंगाच्या हॉस्पिटलमध्ये हलवलं, पण उपचारांना प्रतिसाद न देता एलॉर्ड देवाघरी गेला. तो ज्या फॉस्टर होममध्ये होता तिथल्या मालकिणींनी पोलिसांना हनी बन्सवरून घडलेल्या या घटनेबद्दल सांगितलं आणि चौकशीची चक्रे फिरली. तपासाअंती तुरुंगातल्या पाच अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं गेलं.
मॉरिस हॅरिस हा १७ वर्षांचा तरुण काही महिन्यांपूर्वी असाच मृत्युमुखी पडला. तो तुरुंगात होता तेव्हा हनी बन्सच्या आमिषाला बळी पडून त्याने एका नवीन आलेल्या बाल गुन्हेगाराला भरपूर मारलं. कालांतराने तो तुरुंगातून बाहेर आला आणि त्याच्यासोबत हनी बन्सच्या बदल्यात ज्याला
त्यानं चोपलं होतं तो मुलगाही! त्या मुलाने मनात राग धरून मॉरिसला गोळी घातली. तो पुन्हा तुरुंगात गेलाच आहे, पण मॉरिसचं मार्गावर येऊ लागलेलं आयुष्य मात्र अवचित संपलं. स्वस्त आणि गोड वाटणाऱ्या हनी बन्समुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वरवर पाहता हा प्रकार गोंधळात टाकणारा वाटतो. हनी बन्सचा उपयोग तुरुंगातले (विशेषत: लहान मुलांच्या) पोलीस कधी कधी स्वत:च्या करमणुकीसाठीही करून घेतात. बन्सच्या बदल्यात मुलांना माकडचाळे करायला लावतात. ६८० कॅलरीज आणि ३० ग्रॅम्स स्निग्ध पदार्थानी भरलेल्या हनी बन्सप्रमाणेच स्किटल्स कँडी, चीज बर्गर, फ्राइड राइस, आपल्या खाण्यातल्या पिझ्झाचे उरलेले तुकडे या सगळ्या कमी किमतीच्या आणि बहुतेक वेळा ‘जंक फूड’चं लेबल लावलेल्या अहितकारी, पण मुलांना आवडणाऱ्या खाद्यपदार्थाची लाच देऊन अधिकारी त्यांना आपल्याला हवी ती कामं करून घेतात. एलॉर्डच्या मृत्यूमुळे त्यांचं हे पितळ उघडं पडलं. या घटनेमुळे तुरुंगात काम करणाऱ्या, विशेषत: बाल गुन्हेगारांच्या तुरुंगातील अधिकाऱ्यांची पाश्र्वभूमी पाहायला हवी (कित्येक अधिकारी गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेले असतात.) या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक हवा, अशा विविध मागण्या इथले लोक करीत आहेत. तुरुंगात मुलांना मिळणारं अन्न, त्याचा दर्जा आणि कस याच्याकडे काटेकोरपणे लक्ष द्यायला हवं, असंही इथल्या सामान्य जनतेला वाटतं.
कमीत कमी खर्चात या मुलांना जेमतेम तग धरून राहता येईल इतकंच अन्न मिळतं. मुलांच्या वाढत्या वयाचा, वाढत्या भुकेचा, सकस आहाराचा विचार क्वचितच केला जातो. मुलं कायम भुकेलेली असतात. नेमका याच गोष्टीचा गैरफायदा हे अधिकारी घेताना दिसतात.
तुरुंगात स्टोअर असतं आणि त्यात एरव्ही खायला न मिळणारे, पण मुलांना हमखास आवडणारे खाद्यपदार्थही मिळतात; पण मुलांच्या खात्यात पैसे नसतात. क्वचित आई-वडील, आजी यांपैकी कोणी तरी काही पैसे त्यांच्या खात्यात भरले तरच त्यांना हनी बन्ससारखे पदार्थ परवडतात. (मोठय़ा कैद्यांना कामं करून थोडे पैसे मिळवता येतात- महिन्याला ५०, ६० डॉलर्स) आणि जेलमध्ये मिळणाऱ्या जेवणाव्यतिरिक्त थोडं काही जंक फूड विकत घेता येतं. याचा गैरफायदा घेऊन (एक-दोन हनी बन्सची लालूच दाखवून) साध्या कैद्यांकडून पोचलेले कैदी त्यांचा सोशल सिक्युरिटी नंबर घेतात आणि त्याचा वापर करून, अफरातफरी करून खोटे टॅक्स रिफंड्स मिळवतात. फ्लोरिडाच्या तुरुंगामधल्या दुकानांमधून महिन्याला २,७०,००० हनी बन्सचा व्यवहार होतो असं उघड झालं आहे. लहान-मोठे, फाशीची शिक्षा झालेले सगळे कैदी हनी बन्सकरिता वेडे होतात.
मिष्ट आणि चविष्ट हनी बन्स सध्या फ्लोरिडाच्या तुरुंगांमधलं चलनी नाणं झालं आहे. एका गरीब कैद्याला फाशीच्या शिक्षेपासून वाचवणाऱ्या वकिलाला त्याने हनी बन्स दिले. वकिलाने आनंदाने ते खाऊन संपवले. हनी बन्सचा फाशी झालेल्या कैद्याच्या शेवटच्या जेवणातही सामील असल्याची वदंता आहे.
तुरुंगात हे बन्स वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जातात. पैजा लावण्याकरिता, बर्थ-डे केक, लाच, बेट म्हणून, मानसिक ताण कमी करायला.. या सगळ्या आजारपणांवर एकच औषध म्हणजे हे हनी बन्स!
तुरुंगातलं अन्न कुप्रसिद्ध आहे. जेमतेम २००० कॅलरीज (तरुण कष्टकरी कैद्यांना), स्निग्ध पदार्थ आणि मीठ यांचा अगदी कमी वापर, तुरुंगातल्या स्वयंपाक करणाऱ्या कैद्यांना करायला सोपं, राज्याने परवानगी दिलेल्या १.७६ डॉलर (माणशी, दर दिवशी) बजेटमध्ये बसणारं अतिशय बेचव असं जेवण भूक जेमतेम भागवतं. ज्या कैद्यांच्या खात्यात पैसे असतात (पकडलं गेल्या वेळी अंगावर असलेले, त्यांनी तुरुंगात काम करून मिळवलेले किंवा नातेवाईकांनी त्यांच्या खात्यामध्ये भरलेले) त्यांना तुरुंगातल्या दुकानातून आवडीच्या आणि गरजेच्या वस्तू विकत घेता येतात. सिगारेट्स, पाकिटं (पाकिटांना लावलेला डिंक, तंबाखू असे पदार्थ तुरुंगात निषिद्ध असतात.) असं काही सामान कैद्यांना या दुकानांमध्ये मिळत नाही.
या दुकानांमधून हनी बन्स नेहमीच विकत घेतले जातात. उधारीवर घेतलेले बन्स परत केले नाहीत तर गोष्टी मारहाण, खुनापर्यंत पोहोचतात. दारू आणि अमली पदार्थ यांचं सेवन करता येत नाही, साखर खाऊन थोडं समाधान मिळतं. तुरुंगात मोठी शिक्षा भोगणारा विल्यम म्हणतो, ‘‘मला वाइन प्यावीशी वाटते. ती मला पिता येत नाही, पण मला हनी बन्स खावेसे वाटतात, ते मात्र मला खाता येतात.’’
२००९ मध्ये ६६ सेंट्स असलेली एका बन्सची किंमत ९९ सेंट्स झाली आणि सध्या ती एक डॉलर आणि आठ सेंट्स झाली आहे. कैद्यांची वाढत्या किमतीबद्दल तक्रार असली तरी बन्सचा खप मात्र अजिबात घटलेला नाही.
तुरुंगातल्या कष्टी आयुष्यात हे बन्स कधी कधी कैद्यांच्या आयुष्यात आनंद पसरवतात. वाढदिवस साजरे करायला, ख्रिसमसच्या पार्टीकरिता, वीकेंडला, डे-रूममध्ये इतर कैद्यांबरोबर बॉल-गेम एन्जॉय करताना हनी बन्सचा आस्वाद सगळे कैदी मनमुराद घेतात. बाल गुन्हेगारांमध्ये सुधारणा व्हावी, अशी इच्छा काही मोजक्या तुरुंग अधिकाऱ्यांच्या मनात जरी असली, तर हनी बन्स या मिष्ट पेस्ट्रीजचा उपयोग सकारात्मक पद्धतीने करता येणं तसं कठीण नाही. इच्छा मात्र हवी!

शशिकला लेले
naupada@yahoo.com