अ‍ॅमस्टरडॅम, नेर्दलड्स
लहानपणी आपण अनेक खेळ खेळतो. त्यातला पावसाळ्यातला अगदी आवडता खेळ म्हणजे कागदी होडय़ा बनवून वाहत्या पाण्यात त्या सोडायच्या आणि त्यांचा पाठलाग करायचा! वारा, पाऊस यांची पर्वा न करता ती होडी पुढे पुढे जात असते आणि तिच्यामागोमाग आपण पळत असतो. आपण मोठे होतो तेव्हा आपल्यापैकी काहीजणांना खरोखरच्या मोठाल्या बोटींवर काम करायला मिळतं. प्रवासातही काहीजण बोटीची मजा मुद्दाम अनुभवतात. काही देशांमध्ये शिडाच्या छोटय़ा होडय़ांच्या स्पर्धादेखील असतात. पण आम्स्तर्दाम या नेदरलँड्च्या राजधानीमध्ये एक अनोखा मेळावा रंगतो.. जहाजांचा ‘सेल’! जगभरात कुठे ना कुठे कार्यरत असलेली मोठमोठाली शिडाची जहाजं अथांग, विशाल अशा महासागरांतून लांबच्या लांब अंतर कापत दर पाच वर्षांनी ऑगस्ट महिन्यात आम्स्तर्दाममध्ये येतात आणि एकच जल्लोष होतो. हा पाच दिवसांचा मेळावा म्हणजे सवलतीच्या दरात जहाजं विकण्यासाठीचा ‘सेल’ नसतो, तर या सर्व बोटी शिडं फुगवून कायमच समुद्रावरून सफर करत असतात. म्हणून त्यांना एकत्र आणून सर्व खलाशांबरोबर आनंदोत्सव साजरा करण्यासाठीचा हा ‘सेल’ (रअकछ) असतो.
१९७५ साली आम्स्तर्दाम शहराला ७०० र्वष पूर्ण झाल्याबद्दल ‘सेल आम्स्तर्दाम- ७००’ हा मेळावा पहिल्यांदा आयोजित केला गेला. साधारण १९३० साली बांधण्यात आलेल्या शेवटच्या उंच आणि मोठय़ा व्यावसायिक जहाजानंतर लोकांमध्ये जहाजांविषयी कमी होत चाललेला रस या अनोख्या मेळाव्यामुळे पुन्हा वाढला. खरं तर या मेळाव्याला इतकं यश मिळालं, की त्यानंतर ‘फाऊंडेशन सेल आम्स्तर्दाम (स्तििख़्तग सेल आम्स्तर्दाम (ररअ)’ ही संस्थाच स्थापन केली गेली. तेव्हापासून दर पाच वर्षांनी या मेळाव्याचं आयोजन केलं जातं. त्यामुळेच हा ‘सेल’ जगात होणाऱ्या समुद्राशी संबंधित मोठय़ा मेळाव्यांपकी एक आहे! उंच शिडाच्या मोठय़ा जहाजांबरोबर लहान-मोठय़ा अशा अनेक बोटींना आम्स्तर्दाममधला ‘आय्’ तलाव आपल्यात सामावून घेतो. सर्व जहाजं एका दिमाखदार मिरवणुकीतून- म्हणजेच ‘सेल-इन् परेड’द्वारे या तलावात प्रवेश करतात आणि पुढचे पाच दिवस आम्स्तर्दाम बंदरावरच तळ ठोकतात. या जहाजांखेरीज लोकांना तलावाच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर नेणाऱ्या नेहमीच्या बोटी असतातच. बोटींचं नुसतं जाळं! आय् तलाव आम्स्तर्दाममधल्या मुख्य रेल्वेस्टेशनच्या (आम्स्तर्दाम सेन्त्राल) मागेच असल्यामुळे रेल्वेनं येणाऱ्या प्रत्येकाला हा सोहळा बघायला मिळतो. काही जहाजांवर जाण्यासाठी दोरखंडाचे, लाकडी किंवा धातूंनी बनलेले जिने किनाऱ्यावर सोडलेले असतात. त्यासाठी लोकांच्या रांगा लागतात. पण कुठेही धक्काबुक्की होत नाही. बोटींवर जाऊन त्या आतून बघणं, बोटीची माहिती घेणं, त्यायोगे खलाशांच्या आयुष्याची माहिती घेणं- या सगळ्यात एक मजा असते. मग जहाजाच्या पुढच्या टोकापर्यंत जाऊन खाली पाण्यात बघणं, हात पसरवून समोरच्या अथांग जलाशयाकडे पाहत राहणं, मोकळा श्वास घेऊन हवेतल्या ताजेपणाचा, शुद्धतेचा अनुभव घेणं, या सगळ्या गोष्टी आपसूकच आपल्याकडून घडतात. डच ईस्ट इंडिया कंपनीच्या मूळच्या ‘स्ताद आम्स्तर्दाम’ या जहाजाची प्रतिकृती तर दरवेळीच असते. पण या वर्षी या जहाजा १५ र्वष पूर्ण झाली. त्यामुळे हे वर्ष खास स्मरणात राहील. या जहाजावर गेलं की नकळत भारताच्या इतिहासाची काही पानं डोळ्यांसमोर उलगडतात. दर मेळाव्यात जहाजांमध्ये किंवा लहान-मोठय़ा बोटींमध्ये स्पर्धा असतात. डच नेव्हीदेखील यावेळी मागे राहत नाही. काही नेव्हल बोटी बघण्याची संधीदेखील यावेळी मिळते. त्यातह पाणबुडी हे विशेष आकर्षण असतं. त्यासाठी रांगेत तासन् तास उभं राहणारे लोकही असतात. यावेळी रात्री सर्व बोटी आणि जहाजांवर विद्युत रोषणाई केली जाते. एखाद्या रात्री तर बोटींमधून फटाक्यांची आतषबाजीसुद्धा पाहायला मिळते. नदीकाठी असलेल्या उंच व्यावसायिक इमारतींच्या वरच्या मजल्यांवरून हा ‘सेल’ बघण्याचा आनंद काही औरच!
काही बोटींवर किंवा खास मेळाव्यासाठी बांधलेल्या व्यासपीठावर काही वरिष्ठ खलाशी व अधिकारी गाण्यांच्या मफली भरवतात. हातात ऑर्गन घेऊन मस्त मजेत गाणं म्हणत डुलणाऱ्या त्या खलाशांसोबत आपली पावलेदेखील थिरकतात आणि त्यांचं थिरकणं थांबावं असं आपल्यालाही वाटत नाही. पॉप आणि जॅझ प्रकारातलं हे संगीत आपल्याला खिळवून ठेवतं. संगीतासोबतच पोटपूजेत अनेक डच पदार्थाचा आस्वाद घ्यायला मिळतो. अशा वेळी मात्र खरंच वाटतं, की भारतात ‘स्नॅक्स’ प्रकारात मोडणारे पदार्थ इथे का नाहीत? पर्यटक बोटीची मजा लुटत असताना काही खलाशी वगळता बाकी बरेचसे नाविक आम्स्तर्दाम शहराचा फेरफटका मारतात आणि त्या पाच दिवसांत धमाल मजा करतात. शेवटच्या दिवशी सर्व बोटी एकमेकांना हॉर्न वाजवून संकेत देत खलाशांसह आय् तलावातून पुढच्या प्रवासास सुरुवात करतात. अर्थात त्या निरोपाच्या वेळी सर्वाच्याच मनात पुढच्या भेटीची ओढ लागून राहिलेली असते.
दरवेळच्या मेळाव्यात काही ना काहीतरी नव्या गोष्टी असाव्यात याकडे ररअ ही संस्था लक्ष देते. आणि खरोखरच प्रत्येक वेळी हे नावीन्य राखलं जातं. मी २०१० साली या सेलचा पहिला अनुभव घेतला आणि या वर्षी ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा नव्याने सेल अनुभवला. यावर्षीच्या सेलचा मुख्य विषय होता- ‘सुवर्णकाळातून सुवर्ण भविष्याकडे!’ त्यामुळे जुनी, आकाराने मध्यम अशी जहाजं आणि मोठाल्या शिडांची, प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असणारी जहाजं असे दोन्ही प्रकार बघायला मिळाले. याबरोबरच यंदा मला आणखी दोन प्रमुख आकर्षणं वाटली. पहिलं म्हणजे यावर्षी मेळाव्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी नदीपात्रात एक तात्पुरतं हॉटेल बांधलं गेलं होतं. आणि त्या अनुषंगाने बठक- व्यवस्था केली गेली होती. एक कृत्रिम बीच लोकांसाठी बनवण्यात आला होता; ज्याची आता निशाणीही दिसत नाही!
लोकांना सेलची मजा एखाद्या बोटीतून फिरून घेता यावी याचीही सोय केलेली होती. अर्थात त्याला तिकीट होतं. माझ्या दृष्टीनं दुसरं आकर्षण हे होतं, की यावर्षी त्या बोटींमध्ये भारताची ‘आय. एन. एस. तरंगिणी’ अतिशय दिमाखात उभी होती आणि मोठय़ा प्रमाणावर लोक या बोटीवर जायला उत्सुक होते. त्यावर फडकणारा तिरंगा पाहून ऊर अभिमानाने भरून आला. त्याशिवाय जर्मनी, कोलंबिया, स्पेन, फ्रान्स, नॉर्वे, पोलंड, ब्रिटन, चिली, स्वीडन, इक्वाडोर, रशिया, चेक रिपब्लिक, बेल्जियम, पोर्तुगाल, सिएरा लीओनी, ऑस्ट्रेलिया आणि अर्थातच नेदरलँड अशा सर्व राष्ट्रांची मिळून ४४ जहाजं यात सामील झाली होती. काही बोटींवरच्या खलाशांनी यावेळी काही प्रात्यक्षिकंही केली. त्यामुळे खलाशांच्या आयुष्यातला मनोरंजनाचा एक वेगळा पलू समोर आला.

– डॉ. विश्वास अभ्यंकर
wishwas2610@gmail.com