विद्या हर्डीकर-सप्रे – कॅलिफोर्निया
एक प्रसन्न सकाळ.. कॅलिफोर्नियातली! निळं, मोकळं आकाश आपलं प्रतिबिंब एका निसर्गरम्य सरोवरात पाहणारं. सरोवराकाठच्या मोकळ्या जागेत उभारलेली निळ्या-पिवळ्या फुग्यांची कमान आणि भोवती पन्नासएक कापडी कनापींनी शोभणारी टेबलं. सकाळचे आठ वाजलेले. आणि म्हणून येणाऱ्या लोकांचं स्वागत करणारं न्याहारीचं टेबल. न्याहारीचे मफिन्स एका बेकरीनं देणगी दिलेले; तर कॉफी ‘स्टारबक्स’ने देणगी म्हणून पाठवलेली. बाजूच्या टेबलांवर माहितीपत्रकं घेऊन बसलेले, रंगीबेरंगी टी-शर्ट्स घातलेले हसतमुख स्वयंसेवक! आवारात लगबग करणारे, ‘सेल्फो’(न) ‘सेल्फी’ घेणारे हसते-खिदळते टी-शर्ट्सचे गट! जांभळ्या टी-शर्टवर बोधवाक्य आहे : ‘मेक अ डिफरन्स!’ पिवळ्यावर लिहिलं आहे : ‘एव्हरी जर्नी बिगिन्स विथ दॅट फर्स्ट स्टेप!’ हिरवा टी-शर्टचा जथ्था म्हणतो : ‘कीप काल्म.. लव्ह युवरसेल्फ!’ इथे ‘म्हणत’ कोणीच नाही, आरोळ्या कोणीच देत नाही; पण प्रत्येक टी-शर्टवरचा मजकूर न बोलता बोलतो आहे.. न सांगता मनावर ठसतो आहे. ‘चेंजिंग माइंड- वन स्टेप अ‍ॅट अ टाइम’, ‘स्टिग्मा स्टॉम्पर!’, ‘वॉक फॉर होप!’, ‘रॅप!’ (Wellness Recovery Action Plan), ‘प्रोव्हायडिंग हेल्प.. एम्पॉवरिंग रिकव्हरी’ ही बोधवाक्ये म्हणजे माझ्या ‘नामी’ पदयात्रेची मनाची तयारी! मजबूत बूट आणि ट्रॅकसूट घालून पाच मैल पदयात्रेची तयारी करून माझ्यासारखेच आणखीन दोन हजार लोक आजूबाजूच्या सात गावांतून आलेले आहेत. आमच्या भागातलं ‘नामी’ पदयात्रेचं (NAMI WALK) हे दहावं र्वष आहे. अमेरिकेत गावोगावी ‘नामी’चे हे निधी-संकलन उत्सव होतात. प्रत्येक यात्रीनं आपापल्या मित्रमंडळींना ‘नामी’बद्दल सांगायचं.. जमल्यास पदयात्रेत सामील करून घ्यायचं.. देणग्या मिळवायच्या.. आणि सांगता या नामी पदयात्रेतून करायची! निसर्गाचा आनंद, नव्या लोकांच्या ओळखी आणि मेंदू ताजातवाना करणारा पाच मैलांचा हा व्यायाम! (मेंदू तरतरीत राखण्यासाठी शब्दकोडय़ांच्या बैठय़ा कामापेक्षा शारीरिक व्यायाम जास्त उपयुक्त!) १९७९ मध्ये एका घरात चार कुटुंबांनी एकत्रितपणे सुरू केलेली ‘नॅशनल अलायन्स फॉर मेंटल इलनेस’ (नामी) ही सेवासंस्था आता सबंध अमेरिकाभर फोफावली आहे. आणि आज अमेरिकेतली मानसिक आरोग्यविषयक मूलभूत काम करणारी सर्वात मोठी संस्था आहे. ‘एज्युकेट, अ‍ॅड्वोकेट, लिसन, लीड’ ही ‘नामी’ची चार सूत्रं!
‘मेंदू हा हृदय व यकृतासारखाच शरीराचा एक अवयव. आणि कोणत्याही अवयवाला होतो तसा म्हणजे मधुमेह, रक्तदाबासारखाच विकार मेंदूलाही होऊ शकतो. तो विकार लाजिरवाणा नाही. त्यात रुग्णाचा दोष नसतो. म्हणूनच मनोरुग्णाला औषधोपचार करण्याची आणि माणूस म्हणून सन्मानानं जगायला मदत करण्याची आवश्यकता आहे..’ हे मानसिक आरोग्याबद्दलचे शिक्षण समाजाला देण्याचा वसा ‘नामी’ने उचलला आहे.
ताप आल्यावर औषधोपचार मिळाला नाही तर शरीर तगमगतं- आराम मिळण्यासाठी स्वत:च गोळ्या खा- पाणी पी, इ. स्वयंउपचार माणसं करतात. तसंच मेंदूचं आहे. मेंदूचा काही आजार झाला तर मेंदू तडफडतो, तर्कशुद्धतेच्या जाणिवा कधी थकतात. औषधासाठी.. ‘बरं’ होण्यासाठी त्याचा आक्रोश सुरू होतो. त्यातून स्वयंउपचार होतात- म्हणजे व्यसनाधीनता येते, विवेकाची बंधनं सुटतात. त्यातून कधी गुन्हेगारी, कधी अत्याचारी मनोवृत्ती, तर कधी आत्मघात! माणसाला कीड लागते. पण ती तिथेच थांबत नाही. त्याच्या भोवतालच्या कुटुंबात- आणि पर्यायानं समाजात पसरते. त्यासाठी मनोरुग्णाचं, त्याच्या कुटुंबीयांचं, समाजाचं आणि सरकारचं- अशा विविध पातळ्यांवर प्रशिक्षण करणं, हे ‘नामी’चं एक काम!
माहिती, प्रचार, सरकारशी बोलून पटवणे अशी ‘अ‍ॅडव्होकसी’ करून आज नामीने राष्ट्रीय पातळीवर मानसिक आरोग्यासाठी विधेयके आणली आहेत. मानसिक आजारांवर, मेंदूवर संशोधन, आजारांचे निदान, परिणामकारक उपचार आणि दीर्घकालीन रोगमुक्ती यासाठी ‘आधुनिक मानसिक आरोग्य योजना’ हा या विधेयकांचा सारांश!
नामीने फोन हेल्पलाइन्स सुरू करून मनोरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आवाज ऐकण्यासाठी आणि मदतीसाठी वेगवेगळे प्रकल्प सुरू केले आहेत. आधारगट, ‘पिअर टू पिअर’, ‘फॅमिली हेल्पिंग फॅमिली’ असे शिक्षणवर्ग असे बरेच काही. विशेष म्हणजे हे काम करणारे स्वयंसेवक मनोरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांतलेच असतात. आत्महत्या प्रतिबंध केंद्रे, व्यसनमुक्ती कार्यक्रम, लहान मुलांवर मनोरुग्ण पालकांकडून होणारे अत्याचार थांबविण्यासाठी यंत्रणा, शहरे, परगणे (कौंटी), राज्य आणि मध्यवर्ती शासकीय पातळीवरून होणारे फंडिंग, कार्यक्रम, पोलीस यंत्रणा, विद्यापीठांच्या आरोग्य, वैद्यकीय, मानसशास्त्र, समाजशास्त्र, इ. विभागांचे कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या स्वयंसेवी संस्था, रुग्णालये.. असे मोठे संस्थांचे आणि कामाचे जाळे आहे. त्यांची माहिती देणारे पन्नासएक तरी बूथ मी पाहत होते. इथे आलेले दोन हजार लोक नामी पदयात्रेला काही ना काही कारणाने जोडले गेले होते. ‘तुम्ही यात कसे सामील झालात?’ हा माझा पत्रकारी प्रश्न मी टाळत होते. तरी एका ऐंशी वर्षांच्या आजीबाईंना मी तो विचारलाच! ‘‘अगं, मी आठव्या वर्षांपासून नैराश्याच्या आजाराने आजारी आहे. मला झटके येतात. पण माझा हा ब्याऐंशी वर्षांचा नवरा मला सांभाळून घेतो. संतच आहे बिचारा! मला आहे सांधेदुखी. मी नाही चालणार. पण तो चालणार आहे. नामीच्या आधारगटाचा मला फायदा झाला. मग समाजाला आपण परतफेड करायलाच हवी ना?’’ आजीबाई हसतमुखाने उत्तरल्या.
मी आता वेगळ्या नजरेने सभोवार पाहिले. इथे पांढरे, काळे, मेक्सिकन.. सर्व वर्णाचे, सर्व वयाचे, राजे असोत की रंक- कोणावर कोणत्या आजाराचा कधी हल्ला होईल ते सांगता येत नाही. एक सुदानहून आलेली विद्यार्थिनी आणि एक इराकहून आलेली ‘सार्वजनिक आरोग्य’ (Public Health) विषयाची संशोधिका भेटली. हे आजार, समाजाने रुग्णांना वाळीत टाकणे, अंधश्रद्धांचा पगडा, मनोरुग्णालयांची दुर्दशा इत्यादी प्रश्न कसे जागतिक स्वरूपाचे आहेत, हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात येत होते. पोलिसांचे दोन बूथही शेजारी शेजारी होते. गुन्हेगारी, व्यसने आणि मनोविकार हे हातात हात घालून चालत असतात. त्यामुळे पोलिसांचा बूथ तसा अपेक्षितच. दुसऱ्या बूथवाल्या पोलिसाला मी विचारले, ‘तू काय करतोस इथे?’ (पोलिसाला न घाबरता प्रश्न विचारण्याची संधी म्हणून मी खूश!) ‘अगं, तो शेजारचा शेरीफ जास्त चांगला दिसतो; पण मी जास्त चांगलं काम करतो!’ तो हसत हसत म्हणाला. (व्वा! अमेरिकेतल्या पोलिसांनाही विनोदबुद्धी असते तर!) मग हसता हसता तो पुढे म्हणाला, ‘‘आमचं काम कायदा आणि सुव्यवस्था राखणे. पण म्हणूनच केवळ नामीशी संबंध नाही आमचा; तर आम्हीही माणसं आहोत. म्हणूनच मनोविकाराच्या विळख्यातून आमचीही सुटका नाही. कामाचे ताण आणि स्वरूप म्हणून म्हणा- आत्महत्या करण्याची टक्केवारी पोलीस खात्यात जास्त आहे. तेव्हा ‘नामी’ हा आमचाही आधार आहे! नुसतीच लोकांना मदत नव्हे, तर समाजात सुरक्षा, शांतता राखण्यासाठी मदत करणाऱ्या या आधारसंस्थांचे जाळे एक नागरिक म्हणून नामीशी माझे धागे जुळवायला पुरेसे कारण होते!’’
या नामी पदयात्रेला प्रमुख पाहुणे म्हणून आलेली गावची महापौर, कौंटीच्या आरोग्य खात्याचा प्रमुख अशा बऱ्याच उत्सवमूर्ती या पदयात्रेपूर्वी रंगमंचावर होत्या. पण कुठे हारतुरे नाहीत की पत्रकारांच्या कॅमेरांचा क्लिकक्लिकाट नाही, की उत्सवमूर्तीच्या बरोबर घोटाळणारा गोतावळाही नाही! सुटसुटीत कार्यक्रम. सर्वानी उजवा हात हृदयावर ठेवून अमेरिकन नागरिकांच्या- सर्वाना समान स्वातंत्र्य आणि न्याय यासाठी कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रध्वजाला दिलेली वंदना.. लोकांना हसवणाऱ्या उत्साहमूर्ती सूत्रधाराने गप्पा मारता मारता सहज सांगितलेली मनोरुग्ण, उपचार, खर्च आणि आजारांची टक्केवारी (हा स्वत: एकेकाळी मनोरुग्ण होता.) आणि महापौरांचे मोजून दहा वाक्यांचे मार्मिक भाषण! ‘आपण ऑस्ट्रिचसारखे वाळूत तोंड खुपसून आणि ‘आमच्या घराण्यात नाही बाई ‘असलं’ काही!’ असं म्हणून चालणार नाही. आपल्या आसपास पाहू या. आपण, कुटुंब, नातेवाईक, ओळखीचे- कुठे ना कुठेतरी आणि केव्हा ना केव्हातरी आपला धागा मनोरोगाशी जोडलेला दिसेल. तेव्हा सत्याला सामोरं जाऊ या. मानसिक आजाराशी सामना करू या. आणि रोगमुक्तीसाठी ही पदयात्रा करू या! ‘रिकव्हरी इज नोइंग हू यू आर अँड युटिलायझिंग युवर स्ट्रेंग्थ्स टू बीकम ऑल यू वेअर मेंट टू बी!’
ही महापौर सूट-टाय न घालता चालण्याचे बूट व तुमच्या-आमच्यासारखा साधाच टी-शर्ट घालून आली होती. ती दोन हजारांच्या पदयात्रेत सामावून चालू लागली. एक ‘सन्मान्य’ नव्हे, तर ‘सामान्य’ नागरिक म्हणून!
प्रथम वेगवेगळे असलेले गट नंतर वेगवेगळ्या वेगामुळे परस्परांत मिसळून गेले. काळ्या-गोऱ्या, लहान-मोठय़ा, तान्ह्या-वृद्ध, लठ्ठ-बारीक, श्रीमंत-गरीब.. सर्व धर्माचा तो जनप्रवाह सरोवराच्या काठाने चालत होता. एका कौटुंबिक भावनेचा तो प्रवाह. ठिकठिकाणी पाणी देणाऱ्या छावण्या.. भोज्याच्या छावणीला ‘हाय’ म्हणत परत फिरायचं. त्या प्रवाहाचा भाग म्हणून चालण्यात ‘एक तरी ओवी अनुभवावी’चं समाधान होतं. आणि सरोवरात डोकावून  पाहताना मनाची.. मनातल्या विचारांची प्रतिबिंबं उमटत होती. जगाला हसवणारा रॉबिन विल्यम्स, नाचवणारा मायकेल जॅक्सन, नोबेल पारितोषिकाचा मानकरी डॉ. नॅश- नात्यापासून परिचितांपर्यंतच्या स्वत:च्या विश्वातले विक्षिप्त, छळवादी, व्यसनी, ऑटिस्टिक, निराशावादी- अनेकांबद्दलचे ते विचार.. कधी सहानुभूतीचे, तर कधी रागाचे, कधी माणूस नव्यानं कळलेल्या साक्षात्काराचे, तर काही अगतिक.. नाही कशाला म्हणू? कधी कुणाबद्दल ‘त्याचा स्क्रू ढिला आहे’ म्हणून केलेल्या हेटाळणीचेही!
vidyahardikar@gmail.com