इंग्लंडमध्ये नाताळच्या आदल्या रात्री बच्चेकंपनीला सांताक्लॉजचे वेध लागलेले असतात; तर नाताळच्या दिवशी बहुतांशी वडीलधारी मंडळी कौटुंबिक जेवणानंतर दुपारचे तीन वाजायची वाट पाहत असतात. गेली सुमारे ५७ वर्षे इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी ही दुपारच्या वेळेला टीव्हीद्वारे तिच्या लाडक्या प्रजेशी संवाद साधते आहे. सुमारे दहा मिनिटे राणी गेल्या वर्षांतील एखाद्या महत्त्वाच्या घटनेवर तिचे मत प्रकट करते. कधी कधी तिच्या घरातील नव्या घडामोडी लोकांसमोर प्रकट करून सर्वाना नाताळच्या आणि येणाऱ्या नव्या वर्षांसाठी शुभेच्छा देते. वर्षांतून एकदा या महत्त्वाच्या दिवशी लोकांकडे प्रत्यक्ष जाता आले नाही तरी या नव्या माध्यमातून सुसंवाद साधणारी ही इंग्लंडची आधुनिक राणी! बरेच देश फिरलेली, twitter, फेसबुक आदी नव्या माध्यमांतून प्रथमच लोकांबरोबर संवाद साधणारी अशी अनेक ‘यासम या’ बिरुदे असलेल्या राणीने ९ सप्टेंबर २०१५ रोजी एक नवा विक्रम मोडला. ८९ वर्षांच्या या राणीने या दिवशी दुपारी ४ वाजून १८ मिनिटांनी तिच्या कारकीर्दीचे २२,२२६ दिवस, १६ तास आणि १८ मिनिटे पूर्ण केले. अशा प्रकारे इंग्लंडवर सुमारे ६३ वर्षांहून अधिक राज्य करून सर्वाधिक काळ राज्य करण्याचा हा नवा विक्रम साजरा करण्यासाठी इंग्लंडमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले होते.
दिवसाची सुरुवात करताना राणीने तिचा पती डय़ुक ऑफ इडिनबरो प्रिन्स फिलिप यांच्यासमवेत नव्याने बांधलेल्या स्कॉटिश बॉर्डर रेल्वेने उद्घाटन केले. लंडनमध्ये थेम्स नदीवर दुपारी तोफवंदना झाली. राणीचे निवासस्थान असलेल्या विंडसर कॅस्टल बकिंगहॅम पॅलेस या ठिकाणीसुद्धा लक्षणीय परेड आणि तोफवंदना देऊन या लाडक्या राणीने पुढे आणखी राज्य करत राहावे अशी बऱ्याच धार्मिक गृहांमध्येसुद्धा प्रार्थना करण्यात आल्या. या शुभदिनाचे औचित्य साधून रॉयल मिंटने राणीचा शिक्का असलेली चांदी आणि सोन्याची विशेष नाणी प्रसृत केली.
किंग जॉर्ज पंचम यांच्या मृत्यूनंतर ६ फेब्रुवारी १९५२ रोजी एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी, युनायटेड किंग्डम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, पाकिस्तान आणि तेव्हाचे सिलोन या सात कॉमनवेल्थ देशांची राणी बनली. वयाच्या अवघ्या सव्विसाव्या वर्षी ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी अकालीच आल्याने जराही न डगमगता आल्या प्रसंगाला ताठ मानेने आणि आपल्या भावना फार प्रकट न करता राणी सामोरी गेली. १९५३ साली राणीच्या राज्याभिषेकाचे टीव्हीवरून प्रथमच प्रसारण करण्यात आले. किंबहुना या प्रसंगाचे औचित्य साधून अनेकांनी घरी टीव्ही विकत घेतले. माझ्या शेजारी राहणाऱ्या सॅमच्या आजीने अजूनही तो टीव्ही तिच्या खोलीत ठेवला आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक मंदीमधून जाणाऱ्या इंग्लंडवर राज्य करताना राणीने बरेच चढ-उतार बघितले आहेत. हळूहळू इंग्लंडने औद्योगिकतेबरोबर ज्ञान-विज्ञान आणि बँकिंग क्षेत्रात मोलाची प्रगती केली. सूट जाऊन जीन्स आल्या. केसांचे खोपे जाऊन बॉबकट आले. ज्या इंग्लिश पबमध्ये केवळ रोस्टेड पिग मिळत असे तिथे आता इंडियन, थाय, इटालियन पद्धतीचे जेवण मिळू लागले आहे. ८० च्या दशकात मार्गारेट थॅचरच्या काळातील कामगार वर्गाचा प्रक्षोभ आणि काही वर्षांपूर्वी बँकरच्या विरोधातील मोर्चे ही इंग्लंडमधील स्थित्यंतरे राणीने जवळून पाहिली आहेत. रोजच्या राजकारणात तिचा सक्रिय भाग नसला तरीही आजवरच्या प्रत्येक पंतप्रधानांशी तिने संवाद साधून राज्याची दर आठवडय़ात खबरबात घेतली आहे. आजवर राणीने १२ वेगवेगळ्या पंतप्रधानांशी राजकीय व्यवहार केला आहे. त्यामुळे या १२ गावचे पाणी प्यालेल्या या राणीने वेळोवेळी कानपिचक्या देऊन राज्यकर्त्यांना त्यांच्या प्राथमिक कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. या वार्तालापातूनच ‘An Audience’ या नावाने एक नाटक दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित केले होते. आजही या नाटकाचे परदेशात प्रयोग होत आहेत.
ब्रिटिश समाजात राज्यशाहीविषयी भिन्न मते आहेत. राणीच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमांना कधी कधी प्रजासत्ताकवादी लोक अडथळा आणतात. लोकांच्या पैशाचा गैरवापर राणी आणि तिचे कुटुंबीय यांचा सांभाळ करण्यासाठी होतो आहे, अशी या प्रजासत्ताकवादी लोकांची तक्रार आहे; तर राज्यवादी लोक राजेशाही हे एक कालातीत अढळ स्थान आहे असा प्रतिवाद करतात. सब्रिना ही माझी अमेरिकन मैत्रिण ब्रिटिश लोकांनी फ्रेंच लोकांप्रमाणेच राजेशाहीला उलथून लावावे असा, युक्तिवाद करते. तिच्या मते, माझे ब्रिटिश राजेशाही विषयाचे हे आकर्षण केवळ
‘calonial mind’ चा प्रभाव आहे! तर डायमियन हा मित्र मूळचा पॅरिसला राहणारा. पण तिकडच्या लोकांनी निवडून गेलेल्या राज्यकर्त्यांना कंटाळून गेली २५ वर्षे लंडनमध्ये राहत आहे.
या राजघराण्यातील इतर व्यक्तींविषयी मात्र लोकांच्या भावना तीव्र आहेत. उदाहरणार्थ, अजूनही अनेकांचा ठाम विश्वास आहे की लेडी डायनाच्या मृत्यूला तिचा पती प्रिन्स चार्लस् आणि त्याचे वडीलच कारणीभूत आहेत. प्रिन्स एडवर्ड, लेडी सारा फग्र्युसन यांसारखी पात्रे राजघराण्यातील विनोदाचा विषय बनली आहेत. मात्र राणीविषयी फार कोणी विनोद करीत नाही. ‘Long Live the Queen’ असे ब्रिटनचे राष्ट्रगीत म्हणताना अनेकांची छाती फुलून येते. म्हणूनच २०१२ साली जेव्हा राणीने हीरकमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले तेव्हा अनेकांनी बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर उत्स्फूर्तपणे गर्दी करून राणीला आणि तिच्या कुटुंबीयांना मनापासून शुभेच्छा दिल्या. इंग्लंडमध्ये जारी होणाऱ्या प्रत्येक नोटेवर राणीची मोहोर असते. इकडे पासपोर्टवरसुद्धा ‘In the name of Her Majesty’ असा उल्लेख असतो. पण या सगळ्यातही महत्त्वाची गोष्ट असेल तर अनेकांच्या- ब्रिटिश आणि ब्रिटिश नसलेल्यासुद्धा- हृदयामध्ये असलेली राणीविषयीची आदराची भावना. ज्या राणीच्या रूपाने अनेकांच्या मनात त्यांच्या आई, आजी आणि पणजीचे भाव निर्माण होतात, त्या राणीने शतकानुशतके राज्य करावे हीच इच्छा सर्वदूर प्रकट केली जात आहे यात शंका नाही.
प्रशांत सावंत, लंडन – wizprashant@gmail.com