जपानमधील एका झगे बनविणाऱ्याची ११४ वर्षीय कन्या जगातील सर्वात वृद्ध महिला असल्याचे बुधवारी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्नेही तशी नोंद केली आहे.
पश्चिम जपानमधील ओसाका शहरात राहणारी ही महिला असून मिसाओ ओकावा असे तिचे नाव आहे. जगातील सर्वात वृद्ध महिला म्हणून गिनीज बुकात नोंद झाल्याचे समजल्यानंतर ओकावा यांनी, ‘मी एवढी वर्षे जगले, हे खरंच विलक्षण आहे,’ असे लाजतलाजत सांगितले.
ओकावा यांचा जन्म ५ मार्च, १८९८ मध्ये झाला असून पुढील आठवडय़ात त्या आपला ११५ वाढदिवस साजरा करीत आहेत. नर्सरी होममध्ये राहणाऱ्या ओकावा यांनी जगातील सर्वात वृद्ध महिला असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर अत्यानंद झाल्याचे सांगितले.
सन १९१९ मध्ये त्यांचा विवाह झाला. आयुष्याचे शतक पार करणाऱ्या ओकावा यांना तीन अपत्ये झाली. त्यातील एक मुलगा आणि एक मुलगी अद्याप हयात असून ती वयाच्या नव्वदीत आहेत, असे क्योटो न्यूज एजन्सीने म्हटले आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे वयाच्या ११४ वर्षांपर्यंत ओकावा यांना अद्याप तरी कोणताही मोठय़ा आजाराने ग्रासलेले नाही. चांगले जेवण हेच आपल्या उत्तम आरोग्याचे रहस्य आहे, असे त्या म्हणाल्या.
जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती ही ११५ वर्षांची असून तीदेखील जपानमधलीच आहे. जिरोईमोन किमुरा असे क्योटो येथे राहणाऱ्या या इसमाचे नाव आहे. १९ एप्रिल, १८९७ मध्ये जिरोईमोन किमुरा यांचा जन्म झाला. यामुळे जगातील सर्वात हयात असलेल्या वृद्ध पुरुष व महिलेचा मान जपानला मिळाला आहे.