‘केरोसिन मुक्त दिल्ली’ योजनेअंतर्गत दिल्ली सरकारने वंचित वर्गातील लोकांसह बीपीएल कार्डधारकांना १२ अनुदानित एलपीजी सिलेंडर्स देण्याचा निर्णय सोमवारी घेतला. दिल्ली सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ सुमारे चार लाख कुटुंबांना होणार आहे.
मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली कॅबिनेटची सोमवारी बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने अलीकडेच घेण्यात आलेल्या निर्णयात घरगुती गॅसधारकांना देण्यात येणाऱ्या अनुदानित सिलेंडर्सची संख्या सहावरून नऊ इतकी केली होती. त्यात आणखी तीनने वाढ झाल्याने दिल्लीतील महिलावर्गाची चिंता यामुळे दूर होईल, असे दीक्षित यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
याअगोदर नोव्हेंबर महिन्यात दिल्ली सरकारने वर्षांकाठी नऊ अनुदानित सिलेंडर्स देण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हाही केरोसिन मुक्त दिल्ली योजनेअंतर्गत याचा लाभ ३.५६ लाख गरीब कुटुंबांना होणार होता.
दिल्ली सरकारच्या आजच्या निर्णयाचा लाभ बीपीएल / एएवाय / जेआरसी कार्डधारक असलेल्या चार लाख कुटुंबांना होणार आहे.