बनावट व्हिसाच्या आधारे अबू धाबीला जाणाऱ्या १२ प्रवाशांना गुरुवारी येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआयए) अटक करण्यात आली. विमानतळाच्या टर्मिनल-३वर दुपारी ही घटना घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या गुप्तचर यंत्रणेने एका प्रवाशाला संशयास्पद स्थितीत फिरताना पाहिले. त्याचे नाव ए. एच. अन्सारी असे असून त्याने इमिग्रेशन परिसरात अन्य तिघांची भेट घेतली.अन्सारी याची कसून चौकशी केली असता तो अबू धाबीला पर्यटक व्हिसा घेऊन जात होता. तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे परतीच्या तिकिटाची मागणी केली. तेव्हा त्याने २० ऑक्टोबरचे एअर इंडियाचे तिकीट सादर केले. मात्र अधिक चौकशी केली असता ते तिकीट बनावट असल्याचे स्पष्ट झाले.जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी परतीच्या तिकिटाची खातरजमा न करताच अन्सारीला बोर्डिग कार्ड दिले. अशा पद्धतीने १२ जणांचा अबू धाबीला जाण्याचा मानस होता आणि अन्सारी त्यापैकीच एक होता, असे स्पष्ट झाले. या १२ जणांकडे रोजगार आणि पर्यटक व्हिसा होता, असेही आढळले.