रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या दोन लहान मुलांना मंगळवारी भरधाव संपर्क क्रांतीने चिरडल्याने संतप्त जमावाने गुलाबगंज रेल्वे स्थानकाची इमारत पेटवून दिली. या आगीत गंभीर जखमी झालेल्या दोन कर्मचाऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाला. येथून २० किमी. अंतरावरील गुलाबगंज रेल्वे स्थानकाच्या हद्दीत मयत मुलगा मोहम्मद अली (५) आणि त्याची आठ वर्षांची बहीण उड्डाणपूल नसल्यामुळे मालगाडीच्या खालून रेल्वे मार्ग ओलांडत होते, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. ही दोन्ही मुले मालगाडीखाली सापडून मरण पावल्याची नोंद पोलिसांनी सुरुवातीला केली होती. मात्र गुलाबगंज रेल्वे स्थानकात न थांबणाऱ्या संपर्क क्रांती एक्स्प्रेसबाबत कोणतीही घोषणा न झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे समजते.
या अपघाताचे वृत्त पसरताच संतप्त जमावाने गुलाबगंज रेल्वे स्थानकाच्या दिशेने मोर्चा वळवला. त्यांनी रेल्वे स्थानकाची इमारत पेटवून दिली.
त्या वेळी कार्यालयात असलेले सहायक स्टेशन मास्तर संकेत बन्सल आणि भगवान दास हे दोघे कर्मचारी त्या आगीत होरपळे. गंभीर जखमी झाल्यामुळे भगवान दास यांचा मृत्यू झाला, तर बन्सल यांना पुढील उपचारासाठी भोपाळ येथे हलविण्यात आले.
संतप्त नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन केल्यामुळे अनेक गाडय़ा बिना, भोपाळ आणि विदिशा रेल्वे स्थानकांवर खोळंबून पडल्या. त्यामुळे अतिशय व्यस्त असणारा दिल्ली-चेन्नई रेल्वे मार्गावरील सेवा साडेचार तास विस्कळीत झाली होती.
विदिशाचे जिल्हाधिकारी आनंद शर्मा आणि पोलीस अधीक्षक बी. पी. चंद्रवंशी यांनी संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.