हिवाळय़ाच्या दिवसातील प्रतिकूल वातावरणाचा फायदा घेऊन दहशतवाद्यांना भारतात घुसण्यास मदत करणाऱ्या पाकिस्तानी सैन्यानेच मंगळवारी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषा ओलांडून भारतात शिरलेल्या पाक सैनिकांच्या तुकडीने भारतीय गस्तदलावर हल्ला करून दोन जवानांची हत्या केली व त्यांचे शिर कापून नेल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.
भारतीय लष्कराचे गस्तिपथक मंगळवारी पुंछ जिल्ह्यातील मानकोटे येथे नियंत्रण रेषेजवळ असताना पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. तसेच पाकिस्तानी सैनिकांच्या एका तुकडीने नियंत्रण रेषा ओलांडून १०० मीटर अंतरावर असलेल्या या गस्त दलावर हल्ला केला. यावेळी दोन लान्स नाईक हेमराज व सुधाकर सिंग यांची हत्या करण्यात आली. या दोघांचे शिरही कापून नेण्यात आल्याचे वृत्त आहे. लष्कराने दोन जवान शहीद झाल्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यांचे शिर कापून नेल्याच्या वृत्तावर त्यांनी काहीही भाष्य केलेले नाही.
दोन दिवसांपूर्वी, ६ जानेवारी रोजी पहाटे रामपूर भागात पाकिस्तानी सैन्याने अचानक गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात एका पाकिस्तानी सैनिकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पाकिस्तानने भारताच्या उप उच्चायुक्तांना पाचारण करून या घटनेचा दोष भारतावर टाकला. तसेच भारतीय सैनिकांनी सीमारेषा ओलांडल्याचा दावाही केला. मात्र, भारताने मंगळवारी हा दावा फेटाळून लावला आहे. ‘आमच्या सैन्याने कुठेही सीमारेषा ओलांडलेली नाही. तसेच पाकिस्ताननेही नियंत्रण रेषेचे पावित्र्य जपावे व असे गोळीबार थांबवावेत,’ असे परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले.
दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याची गेल्या महिन्याभरातील ही बारावी घटना आहे. हिवाळय़ाच्या दिवसांत काश्मीरमधील प्रतिकूल वातावरण व ठिकठिकाणी बर्फ साचत असल्यामुळे या परिस्थितीचा फायदा घेत पाकिस्तानातून दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यापासून भारतीय सैनिकांचे लक्ष वळवण्यासाठी पाकिस्तानकडून गोळीबाराचे प्रकार केले जात आहेत. काश्मीरमधील राजौरी, उरी आणि केरान या भागांत पाक सैनिक या हेतूनेच गोळीबार करत असल्याचा दावा भारतीय लष्कराने केला.