हैदराबाद: तेलंगण सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, या मागणीसाठी सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या ३० आमदारांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केले.
काँग्रेस, तेलुगू देशम पक्ष, भाजप, भाकप आणि माकपच्या सदस्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी केली होती. कर्ज टप्प्याटप्प्याने माफ करण्याऐवजी सरसकट माफ करावे, अशी या पक्षांच्या आमदारांची मागणी होती.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गेल्या आठवडय़ात दोन दिवस चर्चा झाली आहे, असे विधानसभा अध्यक्ष ए. मधुसुदनाचारी यांनी स्पष्ट केले आणि प्रश्नोत्तराचा तास पुकारला. विरोधी पक्षाच्या सदस्यांना कामकाजात सहभागी होण्याची विनंतीही त्यांनी केली; परंतु त्याला जुमानले नाही. त्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली, तेव्हा निलंबित करण्याचा ठराव मांडावा, असे अध्यक्षांनी संसदीय कामकाजमंत्री टी. हरिश राव यांना सांगितले.