या वर्षांचा शेवटचा रविवार पाकिस्तानसाठी रक्तरंजित ठरला आहे. देशात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत ४० जण मृत्युमुखी पडले. बलुचिस्तान प्रांतामध्ये शिया समुदायाच्या बसवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात १९ जण मृत्युमुखी, तर २५ जण जखमी झाले, तर तालिबानी दहशतवाद्यांनी पेशावरच्या चेक पोस्टपासून शुक्रवारी अपहरण करण्यात आलेल्या २१ सुरक्षा रक्षकांची हत्या केल्याचे रविवारी सकाळी उघड झाले. इराणला जाणाऱ्या शिया भाविकांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या ताफ्यात एकूण तीन बस होत्या. यापैकी एक बस संपूर्णपणे नष्ट झाली आहे. या बसमध्ये ४३ जण होते. या हल्ल्यामध्ये सुमारे ८० किलो स्फोटके वापरण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या स्फोटातील सर्व जखमींना क्वेटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
२१ सुरक्षा रक्षकांची हत्या
तालिबानी दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आलेल्या २१ सुरक्षा रक्षकांची हत्या करण्यात आली आहे. पेशावरजवळील चेक पोस्टमधून त्या सर्वाचे शुक्रवारी अपहरण करण्यात आले होते. या सर्वाचे मृतदेह रविवारी सकाळी पेशावरजवळील जबाई भागात सापडले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.या सर्वाची एकाच क्रिकेट मैदानात हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी शुक्रवारी २३ जणांचे अपहरण केले होते. यापैकी दोन सुरक्षा रक्षक  बचावले असून यापैकी एक जण गंभीर असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.