नेपाळला शनिवारी तब्बल ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा बसला. या भूकंपातील मृतांचा आकडा ४५० वर पोहचल्याची माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेतर्फे मिळत आहे. ८१ वर्षांनंतर प्रथमच नेपाळला इतक्या मोठ्या तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती, काठमांडूचे पोलीस उपमहानिरीक्षक कमल सिंग बाम यांनी दिली. भूकंपाच्या या तीव्र धक्क्यात शहरातील अनेक इमारतींसह युनेस्कोने जागतिक हेरिटेजचा दर्जा दिलेला काठमांडुतील दरबार स्क्वेअर जमीनदोस्त झाला.
 भारतामध्ये दिल्ली, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांसह संपूर्ण उत्तर भारतात या भूकंपाची तीव्रता जाणवली. तब्बल तीन ते चार मिनिटापर्यंत उत्तर भारतातील झारखंड, छत्तीसगढ, हरयाणा, राजस्थान या भागांत भूकंपाचे हादरे बसत होते. पहिला धक्का ११ वाजून४१ मिनिटांनी, तर १२ वाजून १९ मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला. दिल्लीला बसलेल्या भूकंपाच्या दुसऱ्या धक्क्याची तीव्रता ६.६ रिश्टर स्केल इतकी होती.
सध्याच्या माहितीनूसार, नेपाळमध्ये पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून मृतांचा आकडा ४४९वर पोहचला आहे. नेपाळ आणि काठमांडू भागात सर्वाधिक नुकसान झाले असून या ठिकाणची अनेक घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तसेच दळणवळण आणि संपर्क यंत्रणा ठप्प झाल्यामुळे मदतकार्यात अनेक अडथळे येत आहेत. तर भारतामध्ये २३ जणांचा मृत्यू झाला आहे.  यामध्ये बिहारमधील १४ जणांचा समावेश आहे. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात घराचे छप्पर कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तर बाराबंकी येथे एका आई आणि मुलीला प्राण गमवावा लागला आहे. नेपाळची राजधानी काठमांडू येथील रूग्णालयात सध्या मोठ्याप्रमाणवर जखमींना भरती केले आहेत. 

दिल्ली आणि बिहार या राज्यांमध्ये भूकंपाच्या या धक्क्यांची तीव्रता सर्वात जास्त प्रमाणावर जाणवली. दिल्लीत तीन ते चार मिनिटांपर्यंत भूकंपाने घरे आणि कार्यालयांचा परिसर हादरत होता. त्यामुळे घरातील आणि कार्यालयातील लोक घाबरून रस्त्यावर आले. भूकंपाचे हे धक्के इतके तीव्र होते की, घरातील फर्निचर आणि इतर सामान खाली पडले. तर कार्यालयातील संगणक स्क्रीन्स, भिंती आणि छतावर लावलेले सामान हादरत होते. महाराष्ट्रातील नागपूर येथेही या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. दिल्लीतील भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता ५ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे.

नेपाळमधील काठमांडूपासून ८० किलोमीटर अंतरावर उत्तर-पूर्व परिसरातील लामजुंगजवळ भागात या भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात येत आहे. नेपाळमध्ये या भूकंपाची तीव्रता ७.५ रिश्टर स्केल असल्याचे समजते. नेपाळच्या सीमेला लागून असलेला पूर्व उत्तर प्रदेश, सिक्किम आणि हिमालयाच्या रांगांमध्ये असलेला पश्चिम बंगालचा परिसरात सर्वात जास्त तीव्रतेचे धक्के बसले आहेत. या भूकंपामुळे कोलकाता शहरातील मेट्रोची वाहतूकही ठप्प झाली आहे. दरम्यान, भूकंपानंतर येणाऱ्या आफ्टरशॉक्समुळे उत्तर भारतात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.

बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी गूगलची मोहीम

नेपाळमधील भूकंपानंतर बेपत्ता नागरिकांच्या शोधासाठी गुगलनेही मदतीचा हात पुढे केला आहे. “पर्सनफाईंडर : २०१५ नेपाळ अर्थक्वेक” ही मोहीम गुगलने भारतीय सेनेच्या मदतीने सुरु केली आहे.
https://google.org/personfinder/2015-nepal-earthquake/

या लिंकवर क्लिक करुन बेपत्ता माणसांबाबत माहिती अपलोड करु शकता, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास ती अपलोड करुन आप्तस्वकीयांपर्यंत पोहचवू शकता.

लाईव्ह अपडेटस:

* रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या माहितीनूसार नेपाळमधील मृतांचा आकडा ४५० वर
* संपूर्ण मदतकार्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखरेख
* १५००० ब्लॅकेटस, २५०० तंबू आणि वैद्यकीय उपकरणे आणि डॉक्टरांचे पथक नेपाळला जाणार
* भारताकडून नेपाळसाठी ४ टन मदत साहित्य
* ४० जणांची पहिली टीम नेपाळसाठी रवाना
* राष्ट्रीय आपत्ती सुटका दलाच्या (एनडीआरएफ) १५ टीम्स नेपाळमध्ये मदतकार्यासाठी जाणार
* नेपाळमध्ये अडीच तासांत भूकंपाचे १४ धक्के (आफ्टरशॉक्स)

* नेपाळच्या जनकपूरमधील जानकी मंदिराची मोठ्याप्रमाणावर वाताहत
*  बिहारमध्ये छप्पर कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची भीती
* पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये इमारत कोसळून १० जण जखमी
*  काठमांडूकडे जाणारी विमाने भारताच्या दिशेने वळविण्यात आली.
* काठमांडूमधील रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर जखमींची भरती
* देशभरात झालेल्या नुकसानीचा आणि आपातकालीन परिस्थितीचा आढावा घेणार
* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत बोलविली अधिकाऱ्यांची बैठक
* नेपाळच्या राष्ट्रपतींशी नरेंद्र मोदींनी केली चर्चा, मदतीसाठी विचारणा
* पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चॅमलिंग यांच्याशी चर्चा
* काठमांडू शहरात इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
* उत्तर प्रदेशात सर्वाधिक ६ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के
* दिल्ली शहरातील मेट्रोची वाहतूक थांबवली.