सलमान रश्दी यांचा पाठिंबा

विवेकवादी लेखक एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणखी सहा लेखकांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचे जाहीर केले आहे. त्यात काश्मिरी लेखक गुलाम नबी खयाल, कन्नड लेखक व भाषांतरकार श्रीनाथ डी.एन. व राजेश जोशी यांचा समावेश आहे. देशात जातीयवादी वातावरण असून असहिष्णुताही वाढली आहे, असे या लेखकांचे म्हणणे आहे. आतापर्यंत सोळा लेखकांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली असून त्यात नयनतारा सहगल, अशोक वाजपेयी यांचाही समावेश आहे. लेखक कलबुर्गी यांची हत्या व दादरीतील मुस्लीम व्यक्तीस घरात गोमांस असल्याच्या संशयावरून ठार मारणे या दोन कारणास्तव हे पुरस्कार परत करण्यात आले आहेत. दरम्यान अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असताना नयनतारा सहगल यांच्यासह इतर लेखकांनी पुरस्कार परत करून केलेल्या निषेधाला  बुकर पारितोषिक विजेते लेखक सलमान रश्दी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

हिंदी लेखक मंगलेश डबराल व राजेश जोशी यांच्यासह श्रीनाथ यांनीही आज साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. वरयाम संधू व जी.एन.रंगनाथ राव यांनीही पुरस्कार परत करण्याचे जाहीर केले आहे. खयाल यांनी सांगितले, की देशात अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटत असून घाबरवले जात आहे.

श्रीनाथ यांनी सांगितले, की कलबुर्गी यांचा खून करण्यात आला त्या वेळी केंद्र व राज्य सरकारने गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करायला हवी होती, अशा घटना परत घडता कामा नयेत. आता लेखणीची जागा बंदुकांनी घेतली आहे. श्रीनाथ यांना २००९ मध्ये भीष्म सहानी यांच्या हिंदी कथा कन्नडमध्ये भाषांतरित केल्याबद्दल साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

डबराल व जोशी यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे, की कलबुर्गी खून प्रकरणी जे मौन पाळण्यात आले त्याचा आपण निषेध करतो. गेले वर्षभर लोकशाही मूल्यांची घसरण होत असून त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य व जगण्याचे स्वातंत्र्य यावरच गदा आली आहे. हिंदूुत्ववादी शक्ती जे करीत आहेत, ते मान्य नाही. कलबुर्गी यांच्या हत्येवर साहित्य अकादमीने मौन पाळले, त्यामुळे लोकशाही आता धोक्यात आहे. साहित्य अकादमीने कलबुर्गी हत्या प्रकरणात उघडपणे विरोधातील भूमिका मांडणे गरजेचे होते. अजून लेखकांनी पुरस्कार परत करण्याबाबत सूचना मिळालेल्या नाहीत, असे अकादमीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

उदय प्रकाश, गणेशदेवी, वारयम संधू, भाषांतरकार जी.एन.रंगनाथ राव यांच्याशिवाय पुरस्कार परत करण्याबाबत कुणाच्याही सूचना मिळालेल्या नाहीत.

जोशी यांनी मुंबईत असे सांगितले, की मंगलेश डबरला व आपण काल रात्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे व त्याबाबत अकादमीला कळवले आहे. अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ तिवारी यांना संयुक्त निवेदन पाठवण्यात आले आहे. पुरस्कार परत करण्यास हीच योग्य वेळ आहे. लेखकांच्या हत्या होत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे. जातीयवादी वातावरण तयार झाले आहे, ते सहिष्णुतेला मारक आहे. नाटककार जोशी यांनी सांगितले, की इतक्या मोठय़ा प्रमाणात लेखकांनी पुरस्कार परत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या अकादमीच्या कार्यकारी मंडळापुढे पुरस्कारांच्या पैशांचे आता काय करायचे हा प्रश्न चर्चेला घ्यावा लागेल.

दरम्यान, मुंबईतील उर्दू कादंबरीकार रहमान अब्बास यांनी महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला आहे. शनिवारी कार्यालय बंद असल्याने त्या दिवशी पुरस्कार परत करता आला नव्हता, त्यामुळे आज परत केला, असे अब्बास यांनी अकादमीच्या कार्यालयातून परतल्यानंतर सांगितले. दादरी प्रकरणामुळे आपण पुरस्कार परत केला असून आणखी उर्दू लेखक या निषेधात सामील होतील, असे त्यांनी सांगितले. ‘खुदा के साये मे आँख मिचौली’ या त्यांच्या पुस्तकाला २०११ मध्ये अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.