पंजाबमधील २२ वर्षांच्या युवतीच्या हत्येप्रकरणी फरारी असलेले हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस आमदार राम कुमार चौधरी यांनी मंगळवारी पंचकुला न्यायालयात आत्मसमर्पन केले. याप्रकरणी चौधरी मागील काही आठवडय़ांपासून फरारी होते. त्यांच्याबाबत माहिती देणाऱ्यांना हरियाणा पोलिसांनी ५० हजार रुपयांचे बक्षीसही सोमवारी जाहीर केले होते.
पंजाबमधील होशियारपूरची रहिवासी असलेल्या युवतीची २२ नोव्हेंबरला हत्या करण्यात आली होती. डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे त्या युवतीचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालात देण्यात आली आहे. त्यानंतर मृत युवतीच्या मोबाइल फोनमधील माहितीवरून या प्रकरणात चौधरी यांचे नाव समोर आले. आपल्या मुलीशी चौधरी याचे जवळचे संबंध होते व तोच तिच्या मृत्यूला जबाबदार असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी केली होती.
हिमाचल प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस असलेले चौधरी हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डून मतदारसंघातून निवडून आले आहेत. ते चार वेळा काँग्रेसचे आमदारपद भूषविलेले लज्जा राम यांचे चिरंजीव आहेत.