संसदेवरील हल्ल्यातील आरोपी अफझल गुरू याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडून गृहमंत्रालयाकडे फेरविचारासाठी आला असून त्याबाबत संसदेचे अधिवेशन संपल्यावर निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत १९९३ मध्ये घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोट मालिकेचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम आणि अन्य सर्व अतिरेक्यांना भारतात आणण्यात येईल, असा निर्धारही शिंदे यांनी व्यक्त केला.
‘टीव्ही टुडे’ समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात शिंदे पुढे म्हणाले की, राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी अफझल गुरू याच्या दयेच्या अर्जाची फाइल आपल्याकडे फेरविचारासाठी पाठविली आहे. ती फाइल गृहमंत्रालयाकडे असून त्यावर संसदेचे अधिवेशन संपल्यावर निर्णय घेण्यात येईल.
संसदेचे अधिवेशन संपल्यावर आपण ती फाइल सविस्तरपणे पाहणार आहोत, त्या फाइलचा सखोल विचार करावा लागणार आहे, सध्या ती निर्णयाच्या कोणत्या टप्प्यावर आहे, तेही पाहिले जाईल, असेही गृहमंत्री म्हणाले.
मुंबईत १९९३ मध्ये घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी दाऊद याच्यासह सर्व आरोपींना भारतात आणले जाईल आणि त्यांच्यावर खटला चालविला जाईल, असेही शिंदे म्हणाले. भारताची झपाटय़ाने होत असलेली आर्थिक प्रगती पाकिस्तानला पाहवली नाही आणि त्या मत्सराच्या भावनेतूनच स्फोटांची मालिका घडविण्यात आली. इतकेच नव्हे तर भारतात बनावट चलन पाठवून देशाची आर्थिक व्यवस्था खिळखिळी करण्याचा पाकिस्तान प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट मालिकेसाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या केवळ तीन हजार पाक समर्थकांनाच आणि ३०० अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच भारत व्हिसा देणार आहे. मात्र व्हिसा देण्यापूर्वी अत्यंत काटेकोरपणे खातरजमा करण्यात येणार आहे.