संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने राजकीय कारणांसाठी संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरू याला फाशी दिल्याचा आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी फेटाळून लावला.
 सर्वोच्च न्यायालयाने फाशीचा निकाल दिला होता व त्याची दयेची याचिकाही फेटाळलेली होती. या घडामोडीनंतर त्याला फाशी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तो राजकीय निर्णय असण्याचा प्रश्नच नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हे विधान कशाच्या आधारे केले, असा सवाल करून ते म्हणाले की, त्यांना या मुद्दय़ावर काश्मीरमध्ये राजकारण करायचे असेल, पण त्या वेळी त्यांनी हा मुद्दा कधीच उपस्थित केला नव्हता.
अफजल गुरूला राजकीय कारणांसाठी फाशी दिले व केवळ काही तास आधी आपल्याला कळवण्यात आले, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. अफजल गुरूला ९ फेब्रुवारी २०१३ रोजी फाशी दिले होते.