ऑगस्टावेस्टलॅंडला कंत्राट मिळण्यासाठी देण्यात आलेली काही लाच अभियांत्रिकी कंत्राटांच्या माध्यमातून भारतात पोचविण्यात आली, असे इटलीतील तपास पथकाच्या अहवालात म्हटले आहे. 
तपास पथकातील अधिकाऱयांनी विविध पुरावे गोळा करून एकूण लाचेपैकी सुमारे दोन कोटी दहा लाख युरोची लाच अभियांत्रिकी कंत्राटांच्या माध्यमातून दर महिन्याला भारताकडे पोचविल्याचे म्हटले आहे. २००७ ते २०११ या कालावधीत ही लाच भारताकडे पोचविण्यात आल्याचे पुरावे तपास अधिकाऱयांना मिळाले आहेत. आयडीएस इंडिया आणि आयडीएस ट्युनिशिया या दोन कंपन्यांच्या माध्यमातून ही लाच देण्यात आली.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करताना इटलीच्या ऑगस्टावेस्टलॅंड कंपनीने मध्यस्थामार्फत लाच दिल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. फिनमेकानिका कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोजफ ओर्सी यांना मंगळवारी लाच दिल्याच्या आरोपावरून इटलीमध्ये अटक करण्यात आली.
एडब्ल्यू आणि गॉर्डियन सर्व्हिसेस या दोन कंपन्यांमधील सल्लागारासाठीच्या कंत्राटामधूनही लाचेची काही रक्कम भारताकडे पोचविली गेल्याचे अहवालात नमूद केले आहे. अहवालातील माहितीनुसार, दर महिन्याला पाच लाख दहा हजार युरो वर नमूद केलेल्या कंपन्यांकडे वितरित करण्यात आले आणि त्यावर काहीही कर आकारण्यात आला नाही.