‘एअर इंडिया’च्या ‘ड्रीमलायनर’ या विमानसेवा कंपनीच्या ताफ्यातील अडचणींना विराम मिळण्याची शक्यताही सध्या तरी दृष्टिपथात आलेली नाही. शुक्रवारी कंपनीच्या व्यवस्थापनाला मेलबर्न-दिल्ली विमानाचे उड्डाण रद्द करावे लागले. तर सिंगापूर-चेन्नईची सेवा सुरू होण्यासाठी प्रवाशांना तब्बल सहा तासांहून अधिक काळ वाट पाहावी लागली.
‘एआय-३०१’ या विमानाचे प्रसाधनगृह तुंबल्याने मेलबर्न-दिल्ली हे ‘बोइंग ७८७’ हे विमान रद्द करावे लागले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाहून उड्डाण करू शकले नाही. याच क्षमतेच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल सहा तास विमानतळावर थांबवून ठेवावे लागले. त्यानंतर या विमानाने चेन्नईसाठी उड्डाण केले. या विमानाची वेळ सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी होती.
मेलबर्नमधील विमानातील अनेक प्रवाशांची तात्पुरती सोय एका हॉटेलात करण्यात आली होती, असे सूत्रांनी सांगितले. तर काही प्रवाशांना पर्यायी विमानाने पाठवण्यात आले. काही दिवसांपूर्वी ड्रीमलायनरच्या सेवेत दिरंगाई झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता.
एअर इंडियांच्या ड्रिमलायनर या नव्या विमान वाहतूक सेवेत वारंवार तांत्रिक बिघाड आणि दिरंगाईमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. त्याचा प्रत्यय पुन्हा शुक्रवारी प्रवाशांना आला. याबाबत दिल्लीतील प्रवाशांनी संताप व्यक्त केला. विमान कंपनीने आपल्या सेवेत सुधारणा करणे आवश्यक असल्याचे म्हटले.