विद्वेषपूर्ण भाषण केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले एमआयएमचे आमदार अकबरुद्दिने ओवेसी यांची बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपण्यास एका दिवसाचा कालावधी राहिलेला असतानाच त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
आदिलाबाद जिल्ह्य़ातील निर्मल शहरातील स्थानिक न्यायालयाने ओवेसी यांना १२ ते १६ जानेवारी या कालावधीत चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार होते.
तथापि, ही मुदत संपण्याच्या एक दिवस अगोदरच बुधवारी पहाटे ओवेसी यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. तेव्हा त्यांची रवानगी आदिलाबाद जिल्हा कारागृहात करण्यात आली. त्यांना २२ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे पोलसांनी सांगितले.
ओवेसी यांच्या चौकशीतून जी माहिती हाती आली आहे त्याने पोलिसांचे समाधान झालेले नाही. ओवेसी यांनी चौकशीदरम्यान सहकार्य केले नाही आणि ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, सीडीमध्ये जो आवाज आहे तो आपला नसून आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी ही कृती करण्यात आली असल्याचे ओवेसी यांनी सांगितले, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र पोलिसांनी त्याला दुजोरा दिला नाही.