गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून जमावाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मोहम्मद अखलाख यांच्या कुटुंबीयांनी आपले मूळ गाव असलेल्या बिशादा या गावातून दिल्ली येथे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.
मोहम्मद अखलाख यांच्या मोठय़ा मुलाने कुटुंबीय दिल्लीमध्ये स्थलांतरित झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून २०० जणांच्या जमावाने मोहम्मद अखलाख यांच्यावर हल्ला केला होता. या घटनेत इकलाख यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत अखलाख यांचा २२ वर्षीय लहान मुलगा दानिश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नोएडातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सुधारत असून तो कुटुंबीयांशी बोलू शकत आहे. बिशादा गावामध्ये पोलिसांनी हिंदुत्ववादी नेत्यांना बंदी घातली असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. साध्वी प्राची यांना या गावात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी यामध्ये राजकारण असल्याचा आरोप करताना ओवेसी यांना कसा प्रवेश देण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला.

विभिन्नता, बहुविधता, बंधुभाव ही देशाची वैशिष्टय़े आहेत. याची प्रत्येक नागरिकाने जाणीव ठेवणे आवश्यक आहे. राष्ट्र म्हणून भारताच्या ज्या मध्यवर्ती कल्पना आहेत आणि त्या घटनेत प्रतिबिंबित झाल्या आहेत. त्या प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
प्रणब मुखर्जी, राष्ट्रपती

योगी आदित्यनाथ यांचे वादग्रस्त वक्तव्य
विहिंपच्या नेत्या साध्वी प्राची यांना बिशादा गावात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. दिल्लीपासून ६० किमी अंतरावर असलेले हे गाव पूर्वपदावर येत असतानाच भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांकडून त्रास होत असलेल्या हिंदूंना बंदुका पुरविण्यापासून सर्व मदत पुरविण्यात येईल, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली ‘हिंदू युवा वाहिनी’ ही संघटना चालविली जाते. आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यामुळे ही संघटना पुन्ह एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.