डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मपरिवर्तन करताना याच भूमीतील धर्म निवडला. हे त्यांचे देशावरील उपकार आहेत. हीच राष्ट्रभक्ती डॉ. आंबेडकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील समान दुवा आहे, अशी भावना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली. डॉ. आंबेडकर व संघाचा आजचा संबंध नाही. फक्त संघाने काही गोष्टींची कागदोपत्री नोंद केली नाही. त्यामुळे अनेक गोष्टी समोर आल्या नाहीत, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी संपादित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चार पुस्तकांचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते येथे झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. आंबेडकरांवरील पुस्तक प्रकाशनास सरसंघचालक उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे या कार्यक्रमावर संघविरोधकांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया आल्या होत्या.
त्यावर बोलताना भागवत म्हणाले की, दलितांमध्ये संघाचा भक्कम पाया निर्माण व्हावा यासाठी अशा कार्यक्रमांना उपस्थिती लावली जात असल्याचे काही लोक म्हणतात. परंतु संघाचा व डॉ. आंबेडकरांचा संबंध आजचा नाही. मात्र आंबेडकरांचा उपयोग संघाने कधीही लोकप्रियतेसाठी केला नाही.
डॉ. भागवत यांना पुस्तक प्रकाशनाला बोलावल्यामुळे होत असलेल्या टिकेला उत्तर देताना नरेंद्र जाधव म्हणाले की, भागवत यांचे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास उपस्थित राहणे हा आंबेडकरी विचारांचा विजय आहे. आपण भाजपमध्ये जाणार नसून आंबेडकरवादीच राहणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. संघाचे मुखपत्र समजल्या जाणाऱ्या ‘पांचजन्य’ व ‘ऑर्गनायझर’ने डॉ. आंबेडकर यांच्यावरील विशेषांक  प्रकाशन कार्यक्रमास डॉ. जाधव व संघाचे सरकार्यवाह भैय्या जोशी उपस्थित होते.

संघ संस्थापक डॉ. हेडगेवार व डॉ. आंबेडकर यांचे मन एकच होते. कारण दोघांनी देशहितासाठी काम केले.  
– डॉ. मोहन भागवत