ओबामा यांच्या प्रशासनाने जन्माने भारतीय असलेल्या महिलेची अमेरिकेच्या राष्ट्रीय वास्तुसंग्रहालय आणि ग्रंथालय सेवा मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती केली आह़े  हे पद प्रशासकीयदृष्टय़ा महत्त्वाचे मानले जात़े  विशाखा देसाई असे त्यांचे नाव असून मंगळवारी करण्यात आलेल्या १० महत्त्वाच्या पदांच्या घोषणेत देसाई यांचाही समावेश आह़े.  विशाखा देसाई ‘द एशिया सोसायटी’ या जागतिक स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षाही आहेत़
या नेमणुकीनंतर अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात आपल्या प्रशासनात काम करण्याची तयारी दाखविल्याबद्दल दहाही महत्त्वाच्या व्यक्तींचे आभार मानले आहेत.
देसाई या मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर असून त्यांनी आपली पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. मिशिगन विद्यापीठातून पूर्ण केली. १९७७ ते १९९० या कालावधीत त्यांनी म्युझियम ऑफ फाइन आर्ट्स, बोस्टन येथे काम केले. भारतीय, आग्नेय आशियातील आणि इस्लामिक वारशाचे संकलन करण्याचे काम त्यांनी या वास्तुसंग्रहालयासाठी केले. त्याबरोबरच त्या अनेक विद्यापीठांत अतिथी व्याख्यात्या म्हणूनही मार्गदर्शन करतात़