ग्रामीण भागांचा विकास धीम्यागतीने होत असल्याबद्दल हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनी चिंता व्यक्त केली. बच्चन आपल्या संपूर्ण परिवारासह शुक्रवारी येथे आले. प्रकाश झा यांच्या आगामी ‘सत्याग्रह’ चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी ते येथे आले आहेत. 
गावांमधील विकासाला अजून गती मिळालेली नाही. ग्रामीण भागातील लोकांच्या यातना बघून खूप वाईट वाटते. कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून या लोकांचे प्रश्न समोर आलेत. पण ते केवळ प्रातिनिधिक आहेत, असे बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे. खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर भारताच्या विकासाबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. विमानतळं, महामार्ग, हॉटेल्स, गृहबांधणी प्रकल्प इत्यादी विकासाच्या पाऊलखुणा भारतातील विविध शहरांमध्ये दिसताहेत. भारत विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे पाश्चात्य देशांनी भारतात मोठी गुंतवणूक केली. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली, असेही त्यांनी म्हटले आहे.
उदारीकरणानंतर जन्माला आलेले युवक आता स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागले आहेत. सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताकडे बघितले जाते आहे. आम्हाला तरुण असताना जे प्रश्न भेडसावत होते, ते या नव्या पिढीला निश्चितच पडत नाही. अतिशय उत्साही आणि तितकीच आग्रही असलेली ही पिढी आपले भविष्य घडविण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे त्यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिलंय.