काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेतर्फे आजीवन सभासदत्व बहाल करण्यात आले आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शहझाद आलम यांनी याबाबत माहिती दिली.
१६ फेब्रुवारी रोजी सोनिया गांधी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला भेट देणार आहेत. विद्यापीठाच्या ६० व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला त्या मार्गदर्शनही करणार आहेत. यानिमित्ताने सोनिया गांधी भारतीय मुस्लिमांच्या आणि त्यातही विशेषत: मुस्लिम युवकांच्या आकांक्षांबाबत सविस्तर भाष्य करतील, अशी अपेक्षा असल्याचे आलम यांनी सांगितले.
१९२० साली, खिलाफत चळवळीच्या प्रारंभी महात्मा गांधी यांना अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे मानद सदस्यत्व सर्वप्रथम बहाल करण्यात आले होते. त्या वेळी गांधीजींनी दिलेल्या असहकाराच्या हाकेला प्रतिसाद देत विद्यापीठातील युवकांनी बंद पुकारला होता.
काही दिवसांपूर्वी अफझल गुरूला देण्यात आलेल्या फाशीचा निषेध याच विद्यापीठातील काश्मिरी तरुणांनी व्यक्त केला होता. मात्र सोनिया गांधींच्या दौऱ्यादरम्यान काश्मिरी तरुणांतर्फे कोणत्याही प्रकारचा निषेध करण्यात येणार नसल्याचे युवकांचा प्रतिनिधी इम्तियाझ रसूल याने सांगितले.