आईसक्रीम (४.०), जेलीबीन (४.१), किटकॅट (४.४), आणि लॉलिपॉप (५.०) नंतर गुगलचे ‘मार्शमॅलो’ (६.०) या नावाचे अँड्रॉइडचे पुढील व्हर्जन लवकरच बाजारात दाखल होणार आहे.
या व्हर्जनबद्दल बोलताना, तोंडाला पाणी आणणारे अतिशय मऊ किंवा सोनेरी रंगाचे भाजलेले मार्शमॅलो कुणाला आवडत नाहीत?, असा सवाल गुगलचे प्रकल्प व्यवस्थापक जमाल इसॉन यांनी अँड्रॉईड डेव्हलपर ब्लॉगवर लिहिताना विचारला आहे. ज्या डेव्हलपर्सना अँड्रॉइडसाठी नवीन अप्लिकेशन्स तयार करायची आहेत किंवा अपडेट करायची आहेत ते आता सॉफ्टवेअर डाऊनलोड करू शकतात, असंही इसॉन म्हणाले. नवीन ‘मार्शमॅलो’चे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये फिंगरप्रिंट सेंन्सर व सुधारीत पॉवर सेव्हिंग मोड असणार आहे.
प्रत्येक नवीन अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना किंवा ते अपडेट करताना युजर्सना संमतीची आवश्यकता भासणार नाही, असंही गुगलतर्फे सांगण्यात आलं आहे.  जगभरातील ऐंशी टक्के स्मार्टफोन युजर्स अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम वापरतात. दरम्यान, अनेकांकडे जुने व्हर्जन असल्याने त्यासाठी अपग्रेडची सुविधा उपलब्ध नाही. तसेच टॅबलेट करता अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम ही प्रभावशाली ठरत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.